महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फुटपाथ स्कूलने उभारली 'लक्षवेधी गुढी', मतदानाचे केले आवाहन

शाळा आहे पण भिंत नाही. विद्यार्थी आहेत पण वर्ग नाही. शिक्षक आहेत पण फळा नाही. आकाशाचे छत, दुकानासमोरील जागा म्हणजे वर्ग अध्ययनाचे ठिकाण. हे स्वरुप आहे अमरावतीतील फुटपाथ स्कूलचे.

By

Published : Apr 7, 2019, 12:44 PM IST

प्रभातफेरी

अमरावती - गुढीपाडव्यानिमित्त काही न काही कार्यक्रम साजरा होताना दिसत आहेत. पण, या सर्वात राजकमल चौकातील फुटपाथ स्कूलच्या गुढीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदानाची ‘गुढी’ उभारून अमरावतीकरांना मतदान करण्याचे आवाहन केले.

मतदान जागृतीसाठी रॅली


शाळा आहे पण भिंत नाही. विद्यार्थी आहेत पण वर्ग नाही. शिक्षक आहेत पण फळा नाही. आकाशाचे छत, दुकानासमोरील जागा म्हणजे वर्ग अध्ययनाचे ठिकाण. हे स्वरुप आहे अमरावतीतील फुटपाथ स्कूलचे. मुलांना दैनंदिन जगण्यापुरते वाचन लेखन यावे, त्यांची प्रस्थापितांतर्फे पिळवणूक होऊ नये म्हणून स्थानिक अवतार मेहेरबाबा बहुउद्देशीय संस्थेद्वारे शहरातील पारधी समाजातील मुलांसाठी ‘फुटपाथ स्कूल’या नावाने शाळा चालवली जाते.

या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मतदान जागृती करण्याचे ठरवले. शाळेचे निर्माते व राहुल ट्रॅव्हल्स चे संचालक सुरेश ढोक यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मतदानाची गुढी उभारण्याची संकल्पना मांडली. यावेळी राजकमल चौक, अंबादेवी, प्रभात चौक ते जयस्तंभ चौक या मार्गावरून प्रभातफेरी काढून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी 'उठ मतदार जागा हो लोकशाहीचा धागा हो', चला मतदान करुया..लोकशाही रुजवूया या सारख्या घोषणा दिल्या. या प्रभातफेरीकरीता शाळेतील विद्यार्थ्यांसह रुपराव भाम्बुरकर,संगीता भाम्बुरकर,उमा कुशवाह,आकाश घोडेस्वार,सचिन जाधव, दिनेश इंगळे, श्रीकांत पुसदकर,तुलसी राजोरिया,शुभम राणे आदींनी या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला.


अनोख्या गुढीचे वैशिष्ट्य
बांबूच्या काठीवर केशरी, पांढरा व हिरव्या रंगांचे आवरण पांघरुन वर मातीचे मड़के, त्यावर निवडणूक आयोगाचा लोगो, पांढऱ्या कपड्यासह, गाठी, हार, आंब्याची पाने, फुले लावण्यात आली होती. यासह गुढीवर मतदान जनजागृतीचे आवाहन करणारे फलक होते. विशेष म्हणजे ही गुढी फिरत्या स्वरूपाची होती.

ABOUT THE AUTHOR

...view details