अमरावती :शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डी या गावातील ईश्वर अढाऊ यांचा मुलगा ऋत्विक हा किर्गीस्तान येथील ओश स्टेट युनिव्हर्सिटीमधून एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्याने 2021 मध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला असून त्याचे दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण, राहण्याचा आणि इतर खर्च भागवण्यासाठी शेतकरी व शेतमजूर असलेले अढाऊ यांनी त्यांच्याकडील चार एकरपैकी दोन एकर शेती विकली आहे. शेती विकून आलेल्या पैशांमधून ऋत्विकचे दोन वर्षाचे शिक्षण कसेबसे पूर्ण झाले. परंतु आता मात्र पुढील शिक्षणाची फी भरण्याकरिता पैसेच नसल्याने वडिलांपुढे मोठे संकट ठाकले आहे. अढाऊ यांनी आपल्या नातेवाईक तसेच मित्र मंडळीकडून सुद्धा याआधीच मोठ्या प्रमाणात पैसे घेतले आहेत. अशातच आता पुढील शिक्षणाचा खर्च कसा भागवावा? या एकाच प्रश्नाने ते चिंतित आहेत.
भूमीहीन होणे हाच एक पर्याय :कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाला डॉक्टर करायचे. काही झाले तरी आपल्या मुलाचे डॉक्टरकीचे स्वप्न पूर्ण करायचे, ही महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या ईश्वर यांनी खासदार नवनीत राणा यांना निवेदन देऊन विशेष निधीमधून काही तरतूद करण्याची विनंती केली आहे. परंतु मुलाच्या शिक्षणासाठी काहीच तजवीज झालीच नाही, तर उरलेली दोन एकर शेती विकण्याशिवाय माझ्याकडे कुठलाच पर्याय नसल्याचे त्यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.