अमरावती -पाठीच्या मणक्याचा त्रास असल्याने शासकीय कार्यालयात ड्युटीवर येण्यासाठी नांदेडमधील रोजगार हमीच्या कार्यालयातील सतीश देशमुख या सहाय्यक लेखाधिकाऱ्याने चक्क घोड्यावरून कार्यालयात येण्यासाठी परवानगी मागितली होती. परंतु या अजब मागणीने त्यांना घोड्यावरून येण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी परवानगी नाकारली होती. असे असले तरी अमरावतीच्या मेळघाटमधील एका पठ्ठ्याला घोड्यावरून शाळेत येण्यासाठी गुरुजींनी परवानगी दिली आहे.
घोड्यावर बसून गाठतो शाळा -
मनात शिकण्याची जिद्द असली तरी संकटावर मात करून ज्ञानार्जनाचे धडे गिरवले जातात, याची अनेक उदाहरणे आपण पाहत असतो. वडिलांनी कॉलेजमध्ये जायला कार दिली नाही म्हनून महाविद्यालयाला दांडी मारणारेही अनेक बहादूर असतात. मात्र, शिकण्याची जिद्द असली की कोसबर पायदळ जाऊन शाळा गाठणारे ही अनेक आहे. असच एक उदाहरण अमरावतीच्या मेळघाटमधे समोर आले आहे. रस्ते खराब असल्याने सायकल नेहमी पंचर होते. त्यात दळणवळणाची कुठली व्यवस्था नाही. त्यामुळे धारणी तालुक्यातील बहदाली गावातील एक विद्यार्थी थेट घोड्यावर स्वार होऊन १० किलोमीटर अंतरावरील कमळखार या गावात शाळा गाठतो. अभिषेक मांजरेवार, असे या विद्यार्थ्यांचे नाव असून तो यंदा सातव्या वर्गात आहे.