अमरावती - गाय, म्हैस या पाळीव प्राण्यांसह नीलगाय, रानगवा अशा वन्यप्राण्यांचे शेण खाऊन जगणारा शेणकिडा(dung beetle) हा स्वछ वातावरण निर्मितीस मदत करतो. तसेच जमीन सुपीक बनवण्यास देखील अतिशय उपयुक्त अशी भूमिका वठवतो. खर तर, एका अर्थाने मातीचे सोने बनवणारा 'हा' किडा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून महत्वाचा ठरतो.
शेणकिड्याला कीटक वर्गात समाविष्ट करण्यात आले असून, देशात याच्या ३ प्रजाती आढळतात. हा काळ्या किंवा तपकिरी रंगाचा असतो. त्याच्या शरीराचे डोके, छाती आणि पोट असे ३ भाग असतात. त्याचे डोके रुंद आणि चपटे असून या डोक्याच्या साहाय्याने हे किडे ताज्या शेणाचा छोटासा भाग वेगळा करतात. त्यानंतर, शेणाच्या तुकड्यास जबडा आणि पायाच्या साहाय्याने गोल आकार देतात. शेणाचा हा गोळा ते मागच्या पायाने पुढे ढकलत पुढे सरकतात. अशा प्रकारे तो शेणाचा गोळा अर्धा किलोमीटर पर्यंत ढकलत नेऊ शकतात.
शेणकिड्यांमध्ये स्वतःच्या आकारापेक्षा तिप्पट मोठ्या तसेच तब्बल १०४५ पटीहून अधिक वजनाचा शेणाचा गोळा वाहून नेण्याची क्षमता असते. यातील नर किडा हा बीळ तयार करतो. दरम्यान, मादी ही शेणाच्या गोळ्यांचे सरंक्षण करते. बीळ तयार होताच मादी शेणाचा गोळा बिळाकडे ढकलते आणि हे गोळे बिळात साठवले जातात. नंतर या गोळ्यांवरच मादी अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या या शेणाच्या गोळ्यांचा अन्न म्हणून उपयोग करतात. यानंतर अळ्या आपल्या भोवताली कोष तयार करतात. कोषावस्थेतून बाहेर पडण्यास त्यांना १ वर्षाचा कालावधी लागतो. पाऊस पडून जमीन मऊ होईपर्यंत हे किडे बाहेर पडत नाहीत.