अमरावती:स्वर्गीय हरिभाऊ कलोती उद्यान या नावाने ओळखले जाणारे वडाळी येथील उद्यानाचे भूमिपूजन अमरावती नगरपालिका असताना 25 एप्रिल 1976 ला राज्याचे तत्कालीन परिवहन आणि विधान कार्य उपमंत्री बाबुराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले होते. इंग्रजकालीन वडाळी तलावालगत असणार या उद्यानाच्या परिसरात असणाऱ्या टेकड्या जंगल यामुळे हा संपूर्ण परिसर नैसर्गिकदृष्ट्या अतिशय सुंदर होता. 1992 मध्ये महापालिकेची पहिली निवडणूक झाल्यावर या उद्यानाला भली मोठी भिंत बांधण्यात आली. त्यानंतर पुढच्या दशकभरात या उद्यानाचे संपूर्ण चित्र पालटले. अमरावतीकरांसाठी हे एकमेव पर्यटनाचे केंद्र होते. अमरावती शहरासह जिल्ह्यातील आणि अमरावती विभागातील अनेक शाळांच्या सहलीचे हे उद्यान मुख्य केंद्र झाले. लहान मुलांसाठी विविध खेळणे, आकर्षित करणारा कारंजा, रेल्वे गाडी, अनेक पाळणे यासह विविधरंगी गुलाबाच्या झाडांचे खास दालन येथे आहे. असंख्य अशोकाची झाडे आणि अनेक वर्षे जुनी सात ते आठ वृक्षही येथे आहेत.
खासगी संस्थेने गेला विकास:मागील पाच वर्षे वगळता या उद्यानाच्या विकासाचा कंत्राट हा वर्धा येथील राजहंस टुरिझमकडे होता. या खासगी संस्थेने उद्यानातच्या विकासात विविध साहसी खेळ आणून लहान मुलांना याकडे आकर्षित केले. लगतच्या वडाळी तलावात नौका विहारासाठी देखील या उद्यानात पर्यटकांची गर्दी व्हायची. आता राजहंस टुरिझमचा कंत्राट पाच वर्षांपूर्वीच संपला असताना या उद्यानाचे नवे कंत्राट कोणालाही मिळाले नाही. मधात कोरोना काळादरम्यान या उद्यानाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले.
अवैध धंद्यांचे केंद्र:कोरोना काळात सर्वत्र लॉकडाऊन असताना वडाळी उद्यानात मात्र अवैधरित्या दारूविक्री व्हायची. याबाबत पोलीस प्रशासनाला संपूर्ण माहिती असताना देखील या गंभीर प्रकाराकडे कधी पोलीस प्रशासनाकडून लक्ष दिले गेले नाही. या उद्यानाची देखरेख सध्या केली जात नसल्यामुळे या उद्यानात मोठे गवत वाढले आहे. आज देखील दारूसह गांजा ओढणारे टोळके दिवसभर या उद्यानात बसलेले दिसतात.