अमरावती - प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र प्रदर्शित केल्यानंतर अनेक देशांमध्ये आंदोलन झाले. या घटनेचे पडसाद भारतातही उमटले. मुस्लीम मुलतत्ववादाचा मुस्लीम धर्मासह सर्व लोकांना धोका असल्याचे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी यावर मत व्यक्त करताना म्हटले. यामुळे आणखी एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. मॅक्रॉन यांच्या या वक्तव्याचा निषेध म्हणून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजवीर संघटनेच्या नेतृत्वात मुस्लिम समाजाने मॅक्रॉन यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.
राजवीर संघटनेच्या नेतृत्वात मुस्लिम समाजाने मॅक्रॉन यांचा पुतळा जाळला मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या
मुस्लिम समाजाचे प्रषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट आहे. राज्यभरातील मुस्लिम बांधव ठिकठिकाणी निवेदने देऊन फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा निषेध करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुतळा जाळून निषेध करण्यात आला. इमॅन्युअल मॅक्रॉन यांना भारतात येण्यास बंदी घालण्याची मागणी राजवीर संघटनेने केली आहे.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्रानंतर वाद
फ्रान्समधील एका शिक्षकाने वर्गात शिकवत असताना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखविले होते. त्यानंतर मुस्लीम कट्टरतावाद्याने या शिक्षकाचा भररस्त्यात शिरच्छेद केला. या घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी या घटनेचा कठोर शब्दांत निषेध केला. मुस्लीम धर्माबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. अनेक मुस्लीम देशांनी फ्रेंच मालावर बहिष्कार घालण्याची हाक दिली. पाकिस्तान, बांगलादेश, कतार या देशांसह अनेक देशांत आंदोलने झाले. शिक्षकाच्या हत्येनंतर फ्रान्स पोलिसांनी देशातील कट्टरतावाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी शंभरपेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले.
शार्ली एब्दो मासिकाने काढले होते व्यंगचित्र
शिक्षकांची हत्या केल्यानंतर फ्रान्समधील शार्ली एब्दो या मासिकाने मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रदर्शित केले होते. हे व्यंगचित्र वादात सापडले. अनेक मुस्लिम देशांतून या व्यंगचित्राचा निषेध करण्यात आला होता. तसेच सरकारनेही या कृतीस पाठिंबा दर्शविला होता. प्रेषितांचे व्यंगचित्र काढल्यामुळे २०१५ सालीही शार्ली एब्दो मासिकाच्या कार्यालयावर हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला होता.
काय म्हणाले होते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ?
व्यंगचित्र वर्गात दाखविल्याप्रकरणी मॅक्रॉन यांनी माफी मागण्यास नकार दिला. तसेच जगभरात मुस्लीम धर्म संकटात असल्याचे ते म्हणाले होते. कट्टरतावाद्यांविरोधात लढण्यासाठी उपाययोजना करण्याची त्यांनी घोषणा केली. धर्मनिरपेक्षता फ्रान्सचा मूळ गाभा असल्याचेही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुस्लीम देशांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. मॅक्रॉन यांनी व्यंगचित्र काढण्याच्या कृतीचे समर्थन केले.