महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाविद्यालये सुरू करा, अभाविपचे राज्यव्यापी आंदोलन - school

राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यासंबंधी निर्णय घेऊन संभ्रम दूर करावा अशी मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.

महाविद्यालये सुरू करा, अभाविपचे राज्यव्यापी आंदोलन
महाविद्यालये सुरू करा, अभाविपचे राज्यव्यापी आंदोलन

By

Published : Feb 2, 2021, 7:47 AM IST

अमरावती : कोरोनाचा प्रभाव आता आटोक्यात येत आल्याने राज्य शासनाने पाचवी ते दहावीपर्यंत शाळा सुरू केल्या आहेत. शाळांमध्ये हळूहळू किलबिलाट व्हायला लागला आहे. शाळा सुरू झाल्या मात्र महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाविद्यालये सुरू करण्याच्या मागणीसाठी अभाविपच्या वतीने मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे.

महाविद्यालये सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात आहे

हा निर्णय म्हणजे विनोद
राज्यातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करायच्या, कनिष्ठ महाविद्यालय सुरू करायचे आणि महाविद्यालय कधी सुरू होणार याचा मात्र पत्ता नाही. कोरोनानंतर शिक्षण संस्था सुरू करण्याबाबत शासनाकडून घेतले जाणारे निर्णय म्हणजे विनोद असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केल्या. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री, विद्यापीठांचे कुलगुरू कुणीही काही बोलत नाहीत. नेमका काय गोंधळ आहे? महाविदयलाय कधी सुरू होणार हे कळायला हवे असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री रवी डांगे यांनी म्हटले आहे.

प्राचार्यही गप्प
एकीकडे शाळा सुरू झाल्या असताना कुलगुरू बोलायला तयार नाहीत आणि महाविद्यालयांचे प्राचार्यही गप्प बसलेत. महाविद्यालये नेमके सुरू होणार की नाही याची माहितीसुद्धा कुणी देत नसल्याचा रोष विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.

विद्यापीठ, महाविद्यालयांवर मंगळवारी मोर्चा
महाविद्यालये नेमके सुरू कधी होणार यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मंगळवारी राज्यातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावरही विद्यार्थ्यांचा मोर्चा निघणार आहे.

राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
कोरोनाच्या धास्तीनंतर 11 महिन्यांनी शासनाच्या आदेशानुसार लहान मुले शाळेत जायला लागले असताना महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय शासन कधी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शाळा सुरू करण्याचे निर्देश देताना महाविद्यालयांबाबत शासनाने कोणताही निर्णय का घेतला नाही असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा -बजेट हे देशासाठी हवे, निवडणुकांसाठी नको - मुख्यमंत्री ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details