महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवकुमारच्या विक्षिप्तपणाची कर्मचाऱ्यांना धास्ती -दीपालीच्या सहकाऱ्यांची माहिती - हरिसाल वन कर्मचारी शिवकुमार दहशत

हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप करत गुरुवारी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे राज्यातील प्रशासकीय वर्गात खळबळ उडाली. याप्रकणातील आरोपी शिवकुमार याला अटक करण्यात आली असून हे प्रकरण राजकीय पक्षांनी उचलून धरले आहे. आरोपी शिवकुमार आपल्या कर्मचाऱ्यांसोबत किती विचित्र वागत असे, याबाबत स्वत: कर्मचाऱ्यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली आहे.

Deepali Chavan suicide case
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण

By

Published : Apr 1, 2021, 7:36 AM IST

Updated : Apr 1, 2021, 7:25 PM IST

अमरावती - 'मेरी बात सुनोंगे नही तो गोली से उडा दूँगा' अशा शब्दात कर्मचाऱ्यांशी संवाद साधणारा गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा येथील उपवनसंरक्षक आणि दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात अटक असलेला विनोद शिवकुमार हा मुळातच विक्षिप्त होता. हरीसाल येथील वन परिक्षेत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शिवकुमारच्या वर्तणुकीचे विचित्र किस्से 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. शिवकुमारने आमच्या मॅडमला भंडावून सोडले होते. त्या नेहमी प्रेशरमध्ये असायच्या. शिवकुमारचा जाच सहनशक्तीपलीकडे गेल्याने आमच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, असल्याचा आरोप त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : शिवकुमारच्या विक्षिप्तपणाची कर्मचाऱ्यांना असे धास्ती

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या आदल्या दिवशी शिवकुमार होता हरिसालमध्ये -

शिवकुमार रात्री-अपरात्री हरीसाल येथील पर्यटन संकुलात येत असे. त्याठिकाणी तो दीपाली चव्हाण यांना भेटण्यासाठी बोलवत असे. दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी आत्महत्त्या केली. त्याच्या एक दिवस अगोदर शिवकुमार हरीसाल वन परिक्षेत्र कार्यालयात आला होता. त्यादिवशी त्याने दीपाली चव्हाण यांना कुठल्यातरी मुद्द्यावरून खडसावले होते, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

वनरक्षकाला सर्वांसमोर उतरवायला लावली वर्दी -

शिवकुमार याने एक दिवस आम्हला तारूबांदा येथे बोलावले होते. त्यादिवशी 'तू कुछ काम का नही' असे म्हणत मला सर्वांसमोर वर्दी काढण्यास सांगितले होते. मी लोकांकडून पैस खातो, असा आरोप शिवकुमारने माझ्यावर लावून मला निलंबित केले होते. माझी चूक नसताना दोन वेळा माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली, असे समाधान कांबळे या वनरक्षकाने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

अशी होती मनीषा उईकेची भूमिका -

दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी पती राजेश मोहिते यांना लिहिलेल्या पत्रात मनीषा उईके या महिलेच्या नावाचा उल्लेख असल्याने ही महिला कोण असा प्रश्न सर्वाना पडला. 'ईटीव्ही भारत'ने प्रत्यक्ष हरीसाल या गावात जाऊन याची माहिती घेतली. मनीषा उईके ही हरीसाल ते सेमाडोह मार्गावर असणाऱ्या मांगीया या गावातील ग्रामपंचायत सदस्य असल्याची माहिती मिळाली. मांगीया या गावचे पुनर्वसन करण्यासाठी दीपाली चव्हाण यांच्यावर शिवकुमारचे प्रेशर होते. मांगीयच्या पुनर्वसनासाठी कुठलेही लेखी आदेश न देता शिवकुमारने मौखिकरित्या आदेश देत आजच्या आज मांगीया गाव रिकामे कर असे दीपाली चव्हाण यांना बजावले होते. शिवकुमारच्या दबावात दीपाली चव्हाण आपल्या कर्मचाऱ्यांसह मांगीया गावात गेल्या. त्यावेळी पुनर्वसन झालेल्या शेतात ग्रामस्थांनी पीक घेतले होते. शिवकुमारच्या आदेशाने दीपाली चव्हाण यांनी संपूर्ण शेत नष्ट केले. तेव्हा ग्रामस्थांनी त्यांचा ताफा अडवला. या प्रकरणात मांगीया ग्रामपंचायत सदस्य मनीषा उईकेने दीपाली चव्हाणविरुद्ध अ‌ॅट्रॉसिटी अंतर्गत तक्रार दिली. हा असा प्रकार घडल्यानंतर शिवकुमारने मांगीया गावात कारवाईचे आदेश मी दिलेच नव्हते असे म्हणत हात वर गेले, असे चव्हाण यांच्या कार्यालयातील सहकारी सांगतात.

दीपाली चव्हाण अनेकदा रडायच्या -

उप वनसंरक्षक शिवकुमार रात्री-अपरात्री पर्यटन संकुल येथे बैठकीला बोलवायचा. तिथे रक्षक, वन मजुरांसमोर दीपाली चव्हाण यांना रागावायचा. सर्वांसमोर अपमानित झाल्यामुळे दीपाली चव्हाण अनेकदा राडायच्या, अशी माहिती हरीसाल वन परिक्षेत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली.

त्या दिवशी दीपाली चव्हाण हसत खेळत घरी गेल्या होत्या -

घटनेच्या दिवशी दीपाली चव्हाण या तणावात होत्या, अशी माहिती सांगण्यात येत होती. प्रत्यक्षात मात्र, गुरुवारी दीपाली चव्हाण आनंदात होत्या. दुपारी त्यांच्या आई साताऱ्याला निघून गेल्या होत्या. दीपाली चव्हाण साडेचार वाजता कार्यालयाच्या आवारात उभ्या राहून सर्वांशी हसत-खेळत बोलल्या. त्यानंतर त्या घरी निघून गेल्या. सायंकाळी 7.30 वाजता त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्त्या केली.

फोन आला आणि आम्ही दार तोडून घरात शिरलो -

'गुरुवारी दुपारी 2 वाजता मॅडमच्या आई साताऱ्यासाठी निघाल्या. सायंकाळी 7.30 वाजता मी, माझी पत्नी आणि वनरक्षक ज्योती बिसेन माझ्या घरात गप्पा करत बसलो होतो. त्यावेळी मॅडमच्या आईंचा मला फोन आला. दीपालीला काही तरी झाले, तुम्ही ताबडतोब घरी जा, असे त्यांनी सांगतच आम्ही तिघेही मॅडमच्या घराकडे धावलो. घरचे बंद दार तोडून आत शिरलो. यावेळी त्यांच्या बेडरूमचे दारही आतून बंद दिसले. आम्ही ते सुद्धा दार तोडले. त्यावेळी घरात दारूगोळ्याचा गंध येत होता. आम्ही बेडरूममध्ये दाखल झालो तेव्हा मॅडम बेडवर झोपलेल्या दिसल्या. कदाचित त्यांचा बीपी वाढला असावा आणि त्यांनी हवेत गोळी झाडली असावी, असे आम्हला वाटले. माझा पत्नीने त्यांच्या छातीवर हात ठेवला तेव्हा छातीला छिद्र पडले असल्याचे तिला जाणवले. मॅडमने छातीत गोळी झाडली होती. ती गोळी पाठीतून बाहेर आली होती आणि शरीरातून बाहेर आलेले रक्त पलंगावरील गादीत गेले होते. यानंतर आम्ही डॉक्टरला बोलावले. त्यांनी मॅडमला मृत घोषित केले', असे वनरक्षक सतीश गिरगुणे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा -दीपाली चव्हाणचे आणखी एक पत्र आले समोर, प्रकरणात आला नवा ट्विस्ट

Last Updated : Apr 1, 2021, 7:25 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details