अमरावतीच्या एसआरपीएफ जवानाने गायले भारतीय सैन्याला स्फूर्ती देणारे गीत
भारतीय सैन्याचा आत्मविश्वास खचून जाऊ नये, यासाठी अमरावतीतील राज्य राखीव पोलीस दलातील अनिल एकनार या जवानाने भारतीय सैन्याचे मनोबल वाढवणारे व चिनी सैन्याला आव्हान देणारे एक गीत गायले आहे.
अमरावती - गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनच्या जवानांमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात तणाव आहे. चिनी सैन्याकडून वारंवार भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत आहे. भारतीय सैन्य चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. आठ दिवसांपूर्वी चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. भारतीय सैन्याने खचून जाऊ नये, यासाठी अमरावतीतील राज्य राखीव पोलीस दलातील अनिल एकनार या जवानाने भारतीय सैन्याचे आत्मबल वाढवणारे व चिनी सैन्याला आव्हान देणारे एक गीत गायले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी १९६२ ला भारत-चीन युद्धाच्या वेळी सीमेवर जाऊन खंजिरी वाजवत हेच भजन गाऊन भारतीय सैन्याचे मनोबल वाढवले होते.
१९६२ ला भारत-चीनदरम्यान मोठे युद्ध झाले होते. यावेळी भारतीय सैन्याचे मनोबल खचू नये, यासाठी स्वतः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत नेफा बॉर्डरवर गेले होते. युद्धाच्या ठिकाणी जाऊन "आओ चीनियो मैदानमें देखो हिंद का हाथ, तैयार हुआ हिंद तुम्हारे साथ" हे भारतीय जवांनाना ऊर्जा देणारे व चिनी सैन्याला आव्हान देणारे भजन तुकडोजी महाराजांनी गायले होते. त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीतील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ मधील अनिल एकनार या कर्मचाऱ्यांने सुद्धा तुकडोजी महाराजांनी लिहलेल व गायलेले गीत गायले आहे. अनिल एकनार हे सध्या कोरोना योद्धा म्हणून नाशिकच्या मालेगावात बंदोबस्तावर आहे. अशा परिस्थितीत त्यांनी गायलेले हे भजन सर्वांसाठी प्रेरणा देणारे आहे.