अमरावती :आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाच्या दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक पंढरपूरला दाखल होतात. अशातच अमरावती जिल्ह्यातील भाविकांना पंढरपूरला जाता यावे यासाठी येथील रेल्वे स्टेशनवरून भाविकांसाठी अमरावती पंढरपूर अशी विशेष रेल्वे आज सोडण्यात आली. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी नागपूर आणि नया अमरावती स्थानकांवरून विशेष गाड्या सोडण्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली होती.
नवनीत राणांच्या प्रयत्नांना यश : अमरावती जिल्ह्यासाठी विशेष गाडी नया अमरावती ऐवजी अमरावती स्थानकावरून सोडण्याची विनंती खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्र्यांना केली होती. त्यावेळी त्यांनी रेल्वेमंत्र्यांना प्रवाशांना नया अमरावती स्थानकात जाण्यासाठी होणाऱ्या त्रासाची माहिती दिली. त्यांची ही सूचना रेल्वेमंत्री, रेल्वे राज्यमंत्री, महाव्यवस्थापक यांनी मान्य केली होती. 25, 28 जून रोजी पंढरपूरला जाणारी विशेष गाडी नवीन अमरावती स्थानकाऐवजी अमरावती स्थानकावरून दुपारी 2.40 वाजता सुटेल असा आदेश रेल्वे विभागाने जारी केला होता.