अमरावती -कुणाची घरची परिस्थिती जेमतेम, तर कुणाची उत्तम असताना देखील वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आलेल्या वृद्धांची दिवाळी कशी असते, हे जाणून घेणं औत्सुक्याचा विषय असतो. आई-वडील म्हणून मुलाबाळांचा सांभाळ करताना प्रत्येक दिवाळीत मुलांना नवीन कपडे घेऊन देणे, त्यांच्यासाठी छान फराळाची व्यवस्था करणे. स्वतःचे कपडे, फाटलेले असताना देखील मुलांची दिवाळी धडाक्यात व्हावी, यासाठीची धडपड करणे, असे सारे काही आठवत असल्याचे हे वृद्ध सांगतात मात्र मागे जे घडलं, जे झालं! ते आता आम्हाला आठवायचं नाही,असे हे वृद्ध म्हणतात. आम्हाला आमच्या जुन्या आठवणींना अजिबात उजाळा द्यायचा नाही. आता अखेरचा श्वास घेताना जुन्या कटकटींची आठवण नको, असे म्हणत ते हे विषय मागे सारतात. आयुष्याच्या उत्तरार्धात एकाकी जीवन वाट्याला आल्यानंतर वृद्धाश्रमात नवा परिवार मिळाल्यानंतर हे सर्वजण आता इथेच खूश आहेत.
मनाला वाटलं त्या दिवशी दिवाळी
संत गाडगेबाबा मिशनच्या वतीने वालगाव येथे पेढी नदीच्या काठावर 15 ऑगस्ट 1963 साली वृद्धाश्रम सुरू करण्यात आला. 1985 पासून कैलास बोरसे आणि मंगला बोरसे हे पती-पत्नी या वृद्धाश्रमात केअरटेकर सेवा करत आहेत. ज्यांनी दूर केलं, त्यांची आता आठवणही येत नसल्याचे हे वृद्ध सांगतात. विशेष म्हणजे आमच्या मानला वाटलं, तो दिवस आमच्यासाठी दिवाळी असतो, असे ते म्हणतात. त्या दिवशी पुरण पोळी, श्रीखंड, शिरा जे वाटलं ते आम्हाला इथे खाता येतं, असं एका आजींनी सांगितलं. सगळं दुःख पचवल्यावर आज जे आमच्या वाट्याला आलं तेच खरं सुख आहे. असे यवतमाळ जिल्ह्यातील दाभा पाहुर येथून 13 वर्षांपूर्वी वृद्धश्रमात आलेले विठ्ठल पंजळे, निर्मला निंभोरकर आणि माला म्हाला यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केले.