अमरावती- मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. हाताशी असलेल्या सोयाबीन पिकाला शेतातच कोंब फुटले असून कापसाचे बोंडेही सडण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे दिवाळीच्या नेत्रदीपक रोषणाईने घरे सजली आहे. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे दिवाळे निघाल्याने ऐन दिवाळीत शेतकरी चिंतेत सापडलेला आहे.
नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीन पिकाला प्राधान्य देत असतात. दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन पीक घरी आले की शेतकरी ते पीक बाजारपेठेत विकून दोन पैसे कमवतात व आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतात. परंतु, यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्याने पेरण्याही लांबल्या होत्या. त्यातच मध्यंतरी पावसाने दडी मारली होती. त्यामुळे, अनेक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. परिणामी, उत्पादनात घटही झाली. असे असताना मात्र, आता सोयाबीन पीक साथ देईल, अशी भाबळी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु आठ दिवसा पासून सुरू असलेल्या या रिमझिम पावसामुळे सोयाबीन पीक खराब झाले आहे. उभे पीक सडत आहे. तर, कापणी करून शेतात पडलेल्या सोयाबीनला कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे तेल निघाले आहे.