अमरावती -अद्यापही वीज न पोहोचलेल्या मेळघाटातील गावांमध्ये वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर ऊर्जाधारित वीज प्रकल्पाला जिल्हा प्रशासनाकडून चालना देण्यात येत आहे. धारणी तालुक्यातील चोपण या दुर्गम गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे ‘मेडा’च्या सहकार्याने सौर ऊर्जाधारित पारेषण प्रकल्प आकारास आला आहे. लवकरच तो कार्यान्वित होईल. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतीच या प्रकल्पाची तपासणी केली. याप्रकारे संपूर्ण गावाला वीज उपलब्ध करुन देणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प आहे.
161 घरांना वीज जोडणी -
जिल्ह्यात मेळघाटातील धारणी तालुक्यातील चौराकुंड ग्रामपंचायतीअंतर्गत चोपण हे दुर्गम गाव आहे. तेथील 161 घरांना या प्रकल्पामुळे वीज जोडणी मिळणार आहे. मेळघाटातील दुर्गम भागात विद्युतीकरणासाठी वन, ऊर्जा व विविध विभागांच्या समन्वयातून प्रयत्न होतच आहेत. मात्र, शक्य तिथे पारंपरिक वीजपुरवठ्याबरोबरच अपारंपरिक ऊर्जा सुविधांबाबतच्या योजनाही भरीवपणे राबवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्याबाबत प्रशासनातर्फे ‘मेडा’च्या माध्यमातून ठिकठिकाणी सौर ऊर्जाधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय आला आहे. मेळघाटातील चोपण या दुर्गम गावात प्रकल्प आकारास आला आहे. त्याची तपासणी व आवश्यक बाबींच्या पूर्ततेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी उपस्थित होत्या.
हेही वाचा -लोकप्रतिनिधींनो आता तुम्ही बोला..! भर पावसात मराठा आंदोलक कोल्हापुरात दाखल