अमरावती -येत्या 5 ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिराच्या पायाभरणीत देशातील विविध धार्मिक स्थळे व पवित्र नद्यांचे जल टाकले जाणार आहे. दरम्यान, श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासातर्फे अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरूकुंज आश्रमातील माती सुद्धा मागितली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज पहाटे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांच्या हस्ते ही माती जितेंद्रनाथ महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ते ही माती घेऊन अयोध्येला जाणार आहेत.
तुकडोजी महाराजांच्या गुरूकुंज आश्रमातील माती राम मंदिराच्या पायाभरणीत
येत्या 5 ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अयोध्येतील ऐतिहासिक अशा राम मंदिराच्या पायाभरणीत देशातील विविध धार्मिक स्थळे व पवित्र नद्यांचे जल टाकले जाणार आहे. दरम्यान, श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासातर्फे अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरूकुंज आश्रमातील माती सुद्धा मागितली आहे.
अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज मोझरी येथील तुकडोजी महाराजांच्या गुरूकुंज आश्रमाला अनन्य साधारण महत्त्व आहे. राज्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांमध्ये या स्थळाचा सहभाग आहे. सर्वधर्म समभावाची शिकवण येथे दिली जाते. दरवर्षी लाखो भक्त तुकडोजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येतात. म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीची माती ही राम मंदिराच्या उभारणीसाठी मागण्यात आली. तुकडोजी महाराजांच्या प्रार्थना मंदिरासमोर असलेल्या अस्थि विसर्जन कुंडाजवळील माती काढण्यात आली. आता ही माती अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ मठाचे श्रीनाथ पिठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज यांच्यामार्फत अयोध्येत नेली जाणार आहे. जितेंद्रनाथ महाराज यांना प्रधानमंत्री कार्यालयामार्फत या सोहळ्याचे निमंत्रण आले आहे.