अमरावती -राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. राज्यातील सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. मात्र, मुख्य भाजीपाला मार्केट यार्ड कोरोनाच्या नियमांचे पालन करून सुरू ठेवण्यास सूट आहे. त्यामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोठे भाजी मार्केट यार्ड सुरू आहे. परंतु, या बाजारपेठत कोरोना नियमांचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळते. येथे येणारे अनेक लोक हे मास्क लावत नाहीत व सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करत नाहीत.
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे ठोक भाजीपाला मार्केट म्हणून अमरावतीच्या मार्केटकडे पाहिले जाते. बाजारपेठेत पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भामधील हजारो शेतकरी व व्यापारी आपला शेतीमाल विकण्यासाठी येतात. बाजारपेठेत होणारी गर्दी कोरोनाचा उद्रेक होण्यास कारणीभूत ठरू शकते. बाजारसमिती प्रशासनाचा या गर्दीवर कोणताही वचक नसल्याचे दिसते.