अमरावती -उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील एका 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी तिच्या शेतात जाऊन अमानुष अत्याचार केल्याची घटना 14 दिवसांपूर्वी घडली होती. मात्र, उपचारादरम्यान या तरुणीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. दरम्यान, आता या प्रकरणाचे पडसाद देशभर उमटत असून उत्तर प्रदेश सरकारवर टीका होत असतानाच अमरावतीमध्येही सामजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त केला आहे. सोबतच हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून पीडितीला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
हाथरस घटनेच्या निषेधार्थ अमरावतीत पंतप्रधान मोदी, शाह अन् योगींच्या प्रतिमेला मारले जोडे - अमरावती शहर बातमी
उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले.
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील घटनेचा देशभरात निषेध नोंदविण्यात येत आहे. 14 दिवसांपूर्वी झालेल्या या अत्याचाराची घटना उत्तर प्रदेश सरकारने दाबून ठेवल्याचा आरोप होत आहे. ठिक-ठिकाणी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना अमरावतीत ही विविध सामाजिक संघटना या मुलीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या आहे. अशातच आज काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ यांच्या फोटोला जोडे मारून घोषणाबाजी ही केली.
दरम्यान, या प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या देखील संतप्त झाल्या असून आंध्रप्रदेशच्या धर्तीवर संपूर्ण देशात दिशा कायदा लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.