अमरावती -कोरोनाच्या कहारातून अमरावती शहर आणि जिल्हा कसाबसा सावरायला लागला असतानाच आता अमरावतीत कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात डेल्टा प्लसचे एकूण सहा रुग्ण आढळून आले आहेत.
शहार आणि ग्रामीण भागात प्रत्येकी तीन रुग्ण
जिल्ह्यात आढळून आलेल्या सहा रुग्णांपैकी तीन रुग्ण हे अमरावती शहारातील असून वरुड, मोर्शी आणि चांदूरबाजार तालुक्यतातील ग्रामीण भागात एकूण तिघांना डेल्टा झाला आहे. या सहाही जणांची चाचणी तीन महिन्यांपूर्वी करण्यात आली असून सध्या या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. या सर्व सहा रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी करण्यात आली असल्याचे डॉ. रणमले यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसले तरी कोरोनाकाळात ज्याप्रमाणे काळजी घेतली तशीच खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. हात सतत धुणे, नाकाला तोंडाला मास्क बांधणे आणि एकमेकांसोबत अंतर राखून राहण्याचा सल्लाही डॉ. रणमले यांनी दिला.