अमरावती - 'प्रीती बंड या राजकारणात नवख्या आहेत. त्यांना राजकारणातले काहीएक कळत नसताना काही लोक त्यांना राजकारणात ओढत आहेत. खरंतर सुनील खराटे हे योग्य उमेदवार असून वरिष्ठांकडून विचारले गेले तर आम्हाला कोणीही उमेदवार चालेल असेच बोला', अशा स्वरूपाचा कॉल बडनेरा मतदारसंघातील शिवसैनिकांना येत आहे. हा कॉल फेक असून कॉल करणारी व्यक्तीही फेक आहे असे स्पष्ट झाले असताना, असा खोडसाळ प्रकार केला जात असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये सध्या खळबळ उडाली आहे.
बडनेरा विधानसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढला आहे. बडनेरा मतदारसंघ भाजप-शिवसेना युतीत शिवसेनेसाठी सुटेल असे जवळपास निश्चित आहे. शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांना बडनेरा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत अमरावतीत नेहरू मैदान येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रीती बंड यांना बडनेरा मतदारसंघातून संधी दिली जाईल, असे सुतोवाच केले होते. तर, येत्या १-२ दिवसात बडनेरा मतदारसंघातून प्रीती बंड यांच्या उमेदवारीची घोषणा होऊ शकते. असे सारे असताना बडनेरा मतदारसंघातील शिवसैनिकांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल येत आहे.
हेही वाचा - अंजनगाव सुर्जीमध्ये अवैध सागवान साहित्य जप्त; वन विभागाची कारवाई
या फोनकॉलमध्ये आपण शिवसेना भवनातून बोलत असल्याचे सांगून प्रीती बंड यांच्याऐवजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे हे योग्य उमेदवार आहेत. असे सांगून वरिष्ठांनी कॉल केला तर आम्हाला कोणीही उमेदवार चालेल, आम्ही प्रामाणिकपणे काम करू इतकेच उत्तर द्या, असा सल्ला कॉल करणारी व्यक्ती शिवसैनिकांना देत आहे. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीला शिवसैनिकांकडून सुनील खराटे यांच्याविरुद्ध नाराजीचा सूर मतदारसंघात आहे. असे सांगितले जात असताना यावर संबंधित व्यक्ती 'आम्ही अमरावतीत माहिती घेतली असून सर्वजण सुनील खराटे यांनाच तिकीट द्या असे सांगत आहे. विशेष म्हणजे युती जरी झाली नाही तरी सुनील खराटे हे निवडून येऊ शकतात हे निश्चित आहे. यामुळे तुम्हाला वरिष्ठांचा फोन आला तर तुम्ही सुद्धा अशीच बाजू घ्या.' असेही सांगण्यात येत आहे.