अमरावती : Shivani Pachlod Story : कसेबसे राहता येईल असे छोटेसे घर. वडील आधी सायकल रिक्षा चालवायचे त्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांनी ऑटोरिक्षा चालवायला घेतली. परिसरात अवतीभवती श्रीमंती दिसत असली तरी आपल्या घरात असणाऱ्या गरिबीवर सरकारी नोकरीद्वारेच मात करता येईल हे लक्षात आल्यावर सरकारी नोकरीसाठीचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं शिवानीचे प्रयत्न सुरू झाले. दोन वर्षापूर्वी बॉर्डर सेक्युरिटी फॉर्स अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या जागा निघाल्या आणि शिवानीनं त्यासाठी अर्ज केला. परीक्षा देखील उत्तीर्ण केली आणि त्यानंतर पूर्वी कधीही न केलेल्या प्रचंड मेहनतीसाठी शिवानी पक्की तयार होऊन सज्ज झाली. येणाऱ्या सर्व आव्हानांवर मात करत आज देशाच्या सीमेवर तैनात झाली. हा संपूर्ण प्रवास खडतर आणि आव्हानात्मक असला तरी मजेशीर देखील असल्याचं शिवानी मनोज पचलोड हिनं खास 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
कॉल आला आणि पहिल्यांदाच केला धावण्याचा सराव :अमरावती शहरातील तक्षशीला महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतल्यावर शिवानीनं स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. कोरोनाचा काळ असताना सीमा सुरक्षा दलासाठी निघालेल्या जागांसाठी शिवानीने अर्ज केला. त्यानंतर तिला लगेच कॉल आला आणि आपली नेमणूक व्हायलाच हवी या जिद्दीनं तिनं पहिल्यांदाच धावण्याचा सराव सुरू केला. परीक्षा नागपूरला होणार होती. परीक्षेच्या 15 दिवस आधी शिवानीनं पहाटे तीन वाजता उठून धावण्याचा सराव सुरू केला. पहिले तीन-चार दिवस पाय चांगलेच सुजले. आईने हे असं काही करू नको म्हणून नकार दिला. दवाखान्यात देखील घेऊन गेली. मात्र आपल्या स्वप्नपूर्तीची ही संधी जाऊ द्यायची नाही या जिद्दीने धावण्याचा सराव सुरूच ठेवला. नागपूरला झालेल्या शारीरिक चाचणी स्पर्धेत आठ मिनिटांची वेळ असताना साडेपाच मिनिटात सोळाशे मीटर धावण्यात बाजी मारली असं शिवानी म्हणाली.
परीक्षेसाठी तीनवेळा ऑटो रिक्षानेच केला प्रवास : नागपूरला शिवानीची तीन वेळा परीक्षा घेण्यात आली. यासाठी वडील मनोज पचलोड यांच्या ऑटोरिक्षानेच तिने अमरावती ते नागपूर असा तीन वेळा प्रवास केला. ऑटो रिक्षाने जाऊ नका असं शेजाऱ्यांसह नातेवाईकांचं म्हणणं होतं. मात्र माझ्या वडिलांनी आमच्या ऑटो रिक्षातूनच मला तिन्ही वेळा नागपूरला नेलं. दोन वेळा तर आमची ऑटोरिक्षा रस्त्यात बंद पडली होती. रात्री आठ वाजता देखील मध्ये ऑटो रिक्षा बंद पडल्याचा अनुभव थरारक होता. मात्र सुदैवाने सर्व चांगलं होत गेलं असं देखील शिवानीनं सांगितलं.