अमरावती -अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अमरावती शहर आणि अचलपूर शहरात सात दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी काल केली होती. या लॉकडाऊनची सुरुवात आज रात्री 8 वाजेपासून होणार आहे. दरम्यान अमरावती, अचलपूर आणि तिवसा परिसरात असणाऱ्या गावांमध्ये देखील कोरोना वाढत असल्याने असे एकूण 9 गावे कंटेनमेन्ट झोन घोषित करून तिथे लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
'या' गावात लागणार लॉकडाऊन
नवीन निर्णयानुसार अमरावती परिसरातील कठोरा बु., रामगाव, नांदगाव पेठ, वलगाव, रेवसा, बोरगाव धर्माळे गावातील बिजिलॅंन्ड, सिटीलॅंन्ड, ड्रिमलॅंन्ड मार्केटचा संपूर्ण परिसर, तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी तर अचलपूर तालुक्यातील देवमाळी, कांडली, भातकुली या गावांमध्ये लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने राहणार सुरू
ज्या प्रमाणे अमरावती आणि अचलपूर शहरामध्ये लॉकडाऊनचे नियम असणार आहेत, तेच नियम या सर्व गावांना देखील लागू करण्यात आले आहेत. या सर्व गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने ज्यामध्ये मेडिकल, भाजीपाला दुकाने, किराणा दुकाणे हे सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळेत सुरू राहणार आहेत. या दरम्यान सर्व आठवडी बाजार, शाळा, खासगी क्लासेस बंद राहणार आहेत. तसेच शासकीय कार्यालयात देखील केवळ 15 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणार आहे.