अमरावती -सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी भागात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी तसेच पालकांमध्ये देखील शिक्षणाचे महत्त्व रुजावे यासाठी अकोला येथील सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या ( Bahuuddeshiya Seva Sanstha ) वतीने विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. मेळघाटातील एकूण 14 शाळांचे पालकत्व ( Guardianship of 14 schools in malghat ) या संस्थेने स्वीकारले असून 14 शाळांमधील एकूण 211 गरीब हुशार होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने देखील या संस्थेकडून आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या होणारा लाभ स्वीकारला आहे.
असा आहे सेवा बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम :सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मेळघाटातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार एकूण 14 शाळांना पहिल्या टप्प्यात मदत करण्यासाठी निवडण्यात आले. चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या बोलोरी, लवादा, कोहणा, हत्ती घाट, जैतादेवी, ढोमणी पाटा, भांदरी सलोना, बेला, मसुंडी, जामलीवन, भवई, घटांग आणि बिहारी या गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांची निवड करण्यात आली. यापैकी घटांग आणि बिहारी वगळता इतर सर्व बारा गाव ही मुख्यमार्गापासून बऱ्याच आतमध्ये जंगलात वसले आहेत. या सर्व चौदा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी आवश्यक असणारी क्रीडा साहित्य सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वितरित करण्यात आले आहे. यासोबतच या चौदा शाळेतील 207 होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक रित्या दत्तक घेऊन त्यांना वर्षभर लागणारे शैक्षणिक साहित्य संस्थेच्या वतीने पुरविली जाणार आहे.
'स्नेहसंमेलन आणि क्रीडा स्पर्धाही घेणार' :मेळघाटातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी नियमित यावे शिकावे खेळावे आणि आपल्या कलागुणांना विकसित करावे, या दृष्टीने हवे तसे प्रयत्न होत नाही. याबाबत अनेकदा शिक्षकांकडून प्रयत्न केले तरी पालकांकडून प्रतिसाद मिळत नाही. मात्र सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने या शाळांचे पालकत्व स्वीकारले जात असताना या शाळांमध्ये दर महिन्याला संस्थेचे प्रतिनिधी भेट देणार असून पालकांमध्ये आपल्या पाल्यांना नियमित शाळेत पाठविण्याबाबत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये देखील शिक्षणाबाबत आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांच्यात दडलेल्या कलागुणांना विकसित करण्यावर देखील भर दिला जाणार असल्याची माहिती सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वैभव वानखडे यांनी ईटीव्ही भारतची बोलताना दिली. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाणार असून क्रीडा स्पर्धा देखील सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने घेतल्या जाणार असल्याचे वैभव वानखडे म्हणाले.
'मदतीची संपूर्ण माहिती राहणार अपडेट' :सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मेळघाटातील 14 शाळांमध्ये केली जाणारी मदत तसेच 211 होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दिले जाणारे शैक्षणिक साहित्य यासाठी एक हात मदतीचा अशी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून दहा रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत मदत मिळाली. ज्या व्यक्तींनी मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मदत केली आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला आपण दिलेली मदत कोणत्या शाळेला किंवा कोणत्या विद्यार्थ्याला मिळाली याबाबतची संपूर्ण माहिती सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अपडेट केली जाणार आहे. मदत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने आम्ही दिलेल्या रकमेचे काय झाले याची माहिती त्यांना अगदी क्षणभरातच उपलब्ध केली जाणार आहे. आमच्या सेवा बहुउद्देशीय संस्थेचा एकमेव हेतू हा मेळ्घाटातील चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हाच असून यासाठी आम्ही आमच्या वतीने हवे ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे वैभव वानखडे म्हणाले.