अमरावती -माझ्या बेवारस, अनाथ, अपंग, अंध मुलांसाठी मी कोरोनाकाळात आश्रमात येण्यास लोकांना बंदी घातली नसती तर माझे १३० मूल या कोरोना महामारीत एका महिन्यात देवाघरी गेले असते, अशी भावना ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केली. 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना ते यावेळी भावूक झाले होते.
शंकरबाबा पापळकर यांच्यासोबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने साधलेला संवाद कोरोनाने राज्यातील अनेक बालगृह, वृद्धाश्रमात शिरकाव केला. यांमध्ये अनेक बालक व वृद्ध यांचा मृत्यूदेखील झाला. मात्र, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या स्वर्गीय अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधीर, बेवारस मुलांच्या बालगृहात कोरोना शिरकाव करू शकला नाही. आपल्या १२३ बेवारस अनाथ मुलांना डोळ्यासमोर समोर ठेवून शंकरबाबांनी बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी कठोर नियम केले आणि त्याच नियमांमुळे कोरोनाला थांबवण्यात यश मिळाले.
परतवाड्यापासून सहा-सात किलोमीटर अंतरावर शंकरबाबा पापळकर यांचे अनाथ दिव्यांग मुलांसाठी आश्रम आहे. यामध्ये मतिमंद, अनाथ, बेवारस, आणि अंध मुले आणि मुलींचा समावेश आहे. यामध्ये ९८ मुली तर २५ मुले हे वास्तव्यास आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाने अनेक वृद्धाश्रम, बालगृहात कोरोनाने शिरकाव केला होता. त्यामुळे आपल्याही बालगृहात कोरोना शिरला तर या मुलांच्या जिवाचं काय होणार, जर कोरोना शिरला तर या मुलांनी काय करावे, असा पापळकर बाबा यांच्यासमोर होता. त्यामुळे त्यांनी आपल्या या बालगृहात विविध उपाययोजना राबविल्या, कोरोनाला आश्रमात येऊच दिले नाही.
तीनही प्रवेशद्वारांना कुलूप; बाहेरील लोकांना बंदी -
वर्षभर अनेक लोक या बालगृहात भेटी देण्यासाठी येत असतात. येथील मुलांना भेटत असतात. मात्र, मागील पंधरा महिन्यांपासून या सर्व भेटींना शंकरबाबा यांनी बंदी घातली आहे. बाहेरील लोकांना आत येण्याची परवानगी नाही आहे. तसेच बालगृहाला असलेल्या तीनही प्रवेशद्वारावर फलक व कुलूप लावण्यात आले आहेत.
हेही वाचा -शंकरबाबा पापळकरांकडून दिवंगत मा. गो. वैद्य यांना डी. लिट. पदवी अर्पण; अमरावती विद्यापीठाकडून झाला होता सन्मान
वेळोवेळी मुलांची कोरोना चाचणी -
शंकरबाबा यांच्या आश्रमातील १२३ मुलांची आरोग्य विभागाच्या वतीने वेळोवेळी कोरोना चाचणी करण्यात येत होती. तसेच या मुलांना सॅनिटायझर मास्कदेखील लावले जात होते. तपासणीसाठी येणारे वैद्यकीय पथक आरोग्य अधिकारी यांनाही आधी कोरोना चाचणीचे निगेटिव्ह सर्टिफिकेट दाखवणे गरजेचे होते. त्यानंतरच शंकरबाबा त्यांना आपल्या बालगृहात प्रवेश देत होते. या काळात त्यांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले सह आदी. अधिकारी, डॉक्टर यांची भरीव मदत मिळाली असल्याचे शंकरबाबा पापळकर यांनी सांगितले.
कोण आहेत ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर -
शंकरबाबा पापळकर हे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील मूळचे रहिवाशी आहेत. सुरुवातीला शंकरबाबा पापळकर हे देवकीनंदन गोपाला या मासिकाचे संपादक होते. या माध्यमातून राज्यभरातील मोठ्या व्यक्तींशी त्यांची ओळख-भेट असायची. काही दिवस शंकरबाबा पापळकर हे मुंबईतसुद्धा होते. त्यानंतर पत्रकार असताना लोकांची व्यथा मांडत असताना त्यांच्या नजरेत अनेकदा बेवारस मुले, अंध, अपंग मुले दिसायची. त्या पार्श्वभूमीवर या मुलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे. ही भावना शंकरबाबा पापळकर यांची होती. त्यानंतर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रभाकरराव वैद्य यांच्या माध्यमातून त्यांनी वझ्झर येथे 20 एकर जमीन खरेदी केली आणि तिथेच बेवारस अनाथ मुलांसाठी हे बालगृह सुरू केले. या बालगृहाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत २००पेक्षा जास्त मुला-मुलींचे संगोपन केले. २०० मुलांचा बाप म्हणून शंकरबाबा पापळकर यांची ओळख आहे. आश्रमात राहणाऱ्या मुला-मुलींसमोर शंकरबाबा यांचे नाव जोडले गेले आहे. शंकरबाबांनी आतापर्यंत 24 मुलींचे थाटामाटात लग्न पार पाडले आहे. या लग्नांमध्ये कधी अधिकारी पिता होतो तर कधी जिल्हाधिकारी मामाच्या भूमिकेमध्ये दिसतात.
हेही वाचा -ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर झाडांबद्दल काय सांगतात? ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट
पंधरा हजार झाडांचा झाला फायदा -
शंकरबाबा पापळकर यांच्या विस्तीर्ण अशा बालगृहात तब्बल १५ हजार झाडे आहे. या १५ हजार झाडांमधील ५ हजार झाडे ही कडूलिंबाची आहेत. या कडूलिंबाच्या झाडाच्या माध्यमातून ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याचे शंकर बाबा सांगतात. त्यामुळेच या झाडांचा फायदा कोरोना रोखण्यासाठी आम्हाला झाला असल्याचे शंकरबाबा पापळकर सांगतात.
अमरावती विद्यापीठाकडून डी. लीट पदवीने सन्मान -
ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची मानद डी. लीट. पदवी देऊन त्यांचा नुकताच गौरव करण्यात आला. मात्र, आपले कार्य पूर्ण झालेले नसून १८ वर्षांवरील दिव्यांगांना अनाथ आश्रमात राहू देण्याचा कायदा झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे शंकरबाबा पापळकर यांनी सांगितले.