महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेळघाटातील सेमाडोह गावाच्या पुनर्वसन मुद्द्यावरून दोन गट; आदिवासींचा पुनर्वसनाला विरोध

Semadoh Rehabilitation Problem : मेळघाटातील आदिवासी गावांचं पुनर्वसन करण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह या गावाचाही समावेश आहे. मात्र या गावात पुनर्वसनावरुन दोन गट निर्माण झाले आहेत. एका गटानं पुनर्वसनाची मागणी केली आहे, तर स्थानिक आदिवासींनी गावाच्या पुनर्वसनाला विरोध केला आहे.

Semadoh Rehabilitation Problem
Semadoh Rehabilitation Problem

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 4:22 PM IST

सेमाडोह गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया

अमरावतीSemadoh Rehabilitation Problem:मेळघाटातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी व्याघ्र प्रकल्पातील काही गावांचं पुनर्वसन करण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह या गावाचाही समावेश आहे. या गावातील काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडं पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. मात्र, या पुनर्वसनाला काही गावकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळं पुनर्वसनावरून गावात दोन गट पडल्याचं पाहायला मिळंतय. याबाबत ETV भारतनं सेमाडोहमधील नागरिकांशी संवाद साधला आहे.

पर्यटन स्थळ म्हणून सेमाडोह आहे प्रसिद्ध :मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील परतवाडा धारणी मार्गावरील सेमाडोह प्रमुख गाव आहे. हे गाव पर्यटन स्थळ म्हणून देखील प्रसिद्ध आहे. व्याघ्र प्रकल्पामुळं या ठिकाणी पर्यटकांसाठी जंगल सफारीची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात जाणाऱ्या अनेक ट्रक, राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या, खासगी बसेस पूर्वी दही-रबडीसाठी प्रसिद्ध असलेल्या सेमाडोहमध्ये थांबत असत. पण आता दही-रबडीची चव पूर्वीसारखी राहिली नाही.

असं आहे सेमाडहो :सेमाडोह गावात एकूण 683 कुटुंबं असून दोन हजाराच्या जवळपास गावाची लोकसंख्या आहे. या 683 कुटुंबापैकी साडेचारशेच्या आसपास आदिवासी कुटुंब आहेत. तर, इतर बिगर आदिवासी कुटुंबं सेमाडोह येथे चाळीस-पन्नास वर्षांपासून राहत आहेत. शेती हा सेमाडोह येथील रहिवाशांचा मूळ व्यवसाय आहे. या गावात पर्यटनामुळं अनेकांनी हॉटेल व्यवसाय देखील थाटले आहेत. चिखलदरापासून घनदाट जंगल मार्गानं सेमाडोहचं अंतर 19 किलोमीटर आहे.

'या' कारणांमुळं पुनर्वसनाची मागणी :मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तसंच वाघांचं अधिवास क्षेत्र वाढवण्यासाठी गावांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय दोन दशकांपूर्वी घेण्यात आला होता. गावाचं पुनर्वसन करण्यासाठी गावकऱ्यांच्या इच्छेनुसार त्यांचं गाव दुसरीकडं हलवण्याची योजना आहे. काही गावांनीही याला प्रतिसाद दिला आहे. वीस वर्षांपासून सेमाडोह गावाचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याच्या घोषणेमुळं गावाचा विकास थांबला आहे. त्यामुळं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय, असं सेमाडोह येथील रहिवासी प्रेम पाटेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.

जिल्हाधिकाऱ्यांनाही दिलं निवेदन :1994 पासून आमच्या गावाचं पुनर्वसन होणार असल्याचं सांगितलं जातं. आम्हाला कोणत्याही क्षणी गाव सोडावं लागेल, अशी भीती मनात निर्माण झाल्याचं प्रेम पाटेकर म्हणाले. या ठिकाणी आम्हाला काही करता येत नाही. त्यामुळं आमच्या गावाचं पुनर्वसन व्हावं यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. गावात रस्ता नाही, मुलांसाठी योग्य शाळा नाही, आरोग्य सुविधाही गरजेनुसार नाही, अशी माहिती प्रेम पाटेकर यांनी दिली.

आदिवासींचा पुनर्वसनाला विरोध :आमच्या पिढ्या अनेक वर्षापासून या गावात राहतात. आमचं वन्य प्राण्याशी जवळचं नातं आहे. वाघ, अस्वल, हरिण, ससा, कोल्हे, लांडगे आदी वन्य प्राण्यांचा आम्हाला त्रास नाही. काही वन्य प्राणी आम्हाला घाबरत देखील नाहीत, असं सेमाडोह येथील रहिवासी भोला मावस्कर यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं. आम्ही सेमाडोह गावात सुरक्षित आहोत. मी 10-15 वर्षांचा असल्यापासून गावात पुनर्वसनाची चर्चा आहे. या ठिकाणी पर्यटनामुळं चांगला रोजगार मिळतोय. आमच्याकडं शेती देखील आहे. त्यामुळं या मातीशी आमचं घट्ट नातं आहे. पुनर्वसन करुन आम्ही काय करणार असा सवाल मावस्कर यांनी उपस्थित केला आहे.

ज्यांना पुनर्वसन हवं ते आधीच बाहेरून आलेत :आमच्या सेमाडोहसह मेळघाटातील अनेक गावांमध्ये आमच्या कोरकू जमातीसोबत मोठ्या संख्येनं गवळी बांधव राहतात. आता गवळी बंधूंकडं गायींची संख्या मोठी असली, तरी त्यातील मोजक्याच गायी दूध देतात. आता या गवळी बंधूंना गावाचं पुनर्वसन हवं आहे. पुनर्वसनासाठी इच्छुक असलेले लोक आमच्या गावात आले. अशा लोकांना आता पुनर्वसनाची गरज आहे. सरकारनं त्यांचं कुठेही पुनर्वसन केल्यास आमची हरकत नाही. मात्र, आम्ही आमच्या सीमा सोडणार नसल्याचंही भोला मावस्कर यांनी स्पष्ट केलं.

34 पैकी 17 गावांचं झालं पुनर्वसन :मेळघाटातील एकूण 34 गावांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय सरकारनं दोन दशकांपूर्वी घेतला होता. आतापर्यंत 34 पैकी 17 गावांचं पुनर्वसन करण्यात यश आलं आहे. 6 गावांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावांच्या पुनर्वसन प्रक्रियेत ग्रामस्थांचा विरोध तसंच आर्थिक समस्येमुळं अडचणी येत आहेत.

हेही वाचा -

  1. 'मेळघाट हाट': अमरावती शहरात आधुनिक 'मेळघाट हाट' मॉल सुरू
  2. बछड्यांच्या रक्षणासाठी 'ती 'चे नर बिबटला समर्पण; अमरावती लगतच्या जंगलातील दृश्य, पाहा व्हिडिओ
  3. अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावर बिबट्या ठार; अज्ञात वाहनानं दिली धडक

ABOUT THE AUTHOR

...view details