अमरावती -मूर्ती घडविण्यासाठी पीओपीवर बंदी घालण्याबाबत केंद्रीय प्रदूषण मंडळाने नव्या मार्गदशक तत्त्वांच्या अटी घातल्या आहेत. यामुळे पीओपीपासून मूर्ती घडविण्यावर बंदी येण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी अमरावतीत विदर्भातील शेकडो मूर्तिकारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
पीओपी मूर्तींवर बंदी नको; मूर्तिकारांनी काढला मोर्चा गणेशमूर्ती घेऊन निघाला मोर्चाइर्विन चौक येथे विदर्भातील शेकडो मूर्तिकार एकत्र आले. यावेळी ट्रॅक्टरवर गणपतीची मूर्ती ठेवण्यात आली. गणपती बाप्पा मोरया अशा जयघोषात इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक येथून जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मोर्चा पोचला.
हेही वाचा -धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा; अन्यथा, रस्त्यावर उतरू - भाजप महिला मोर्चा
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मोर्चादरम्यान, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला असता पोलिसांनी बॅरिकेडस लावून मोर्चा अडविला. मोर्चातील नेत्यांच्या शिष्टमंडळाने पीओपी वर बंदी नसावी, याबाबत जिल्हाधिकरी शैलेश नवाल याना निवेदन सादर केले.
जिल्ह्यात मूर्ती व्यवसायात 1 लाख 80 हजार कुटुंब
जिल्ह्यात पीओपीद्वारे मूर्ती बनविणारे एकूण 1 हजार कारखाने आहेत. प्रत्येक कारखान्यात 10 ते 25 कामगार आहेत. जिल्ह्यात 1 लाख 80 हजार कामगार कुटुंबे पीओपीद्वारे मूर्ती बनवण्यावर अवलंबून आहेत.
उपोषणावर बसण्याचा दिला इशारा
पीओपीमुळे पर्यावरणाची हानी होत नाही. घराचे सुशोभीकरण, जलशुद्धीकरण यासाठी पीओपीचा उपयोग होतो. शेतीचे पोत सुधारण्यासाठी, वैद्यकीय उपयोगासाठी, रस्ते बांधणीसाठीही पीओपीचा वापर होतो. असे असताना केवळ मूर्तिकारांवर बंदी घालणे, हा अन्याय असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. 'आमच्यावर अन्याय होत असेल तर, आम्ही कुटुंबासह उपोषणावर बसू,' असा इशारा मूर्तिकारांनी दिला.
हेही वाचा -पाणीप्रश्नी शिवसेना आक्रमक, राजदंड पळवण्याचा प्रयत्न