अमरावती -आतापर्यत तुम्ही शाळांचे, नामांकित महाविद्यालयाचे, महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या विविध शाळांचे नावे तुम्ही ऐकलेली आहेत. मात्र, शहरात सुरू झालेल्या एका शाळेचे नाव चक्क "वीटभट्टी" शाळा असे आहे. ही वीटभट्टी शाळा कशी आहे? याचा विशेष रिपोर्ट.
विटभट्ट्यांवरील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक बनले 'कुंभार' रोजच्या भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी मेळघाटातील आदिवासी बांधव विटा बनविण्याच्या कामासाठी शहरातील वीटभट्टी परिसरात सहपरिवार स्थलांतर करतात. या स्थलांतरामुळे त्यांच्या चिमुकल्यांचे आयुष्य शिक्षणाच्या अभावमुळे उध्द्वस्त होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद आणि डायट, जिल्हाधिकारी यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी शिक्षकच 'कुंभार' झाले आहे. त्यासाठी त्यांनी एका शेतात पालाखाली वीटभट्टी शाळा सुरू केली आहे. या शाळेत दोन शिक्षक आहेत. 10 वाजता शाळा भरते. लाडके विद्यार्थी आपल्या शिक्षकांची वाट पाहत असतात. शिक्षक शाळेत पोहोचल्यावर घंटा वाजवतात. यानंतर शाळेला सुरुवात होते.
हेही वाचा -सिपना नदीचे खळखळणारे पाणी, निसर्गाच्या सौंदर्याची उधळण अन् कोलकास विश्रामगृह...
अमरावती शहरापासून अंजनगाव बारी मार्गावर दीडशे ते दोनशे वीटभट्ट्या आहेत. या विटभट्ट्यांवर काम करणारे मजूर हे मध्यप्रदेश आणि मेळघाटातील आदिवासी बांधव आहेत. दिवाळीनंतर ते मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबासह याठिकाणी काम करण्याकरिता येतात. यानंतर होळीला पुन्हा आपल्या गावी जातात. यात 6 ते 7 महिन्यांच्या स्थलांतरणामुळे त्यांची चिमुकली मुले शिक्षणापासून वंचित राहत होती. मात्र, आता या वीटभट्टी शाळेमुळे एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही. या शाळेत अंगणवाडी ते आठवीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नव्याने सुरू झालेल्या या शाळेमुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
अंजनगाव बारी रोडवरील दिलीप अडवाणी यांच्या शेतामध्ये २३ जानेवारी २०२० पासून ही वीटभट्टी शाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये चिखलधरा तालुक्यातील शाळाबाह्य झालेल्या ५६ विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम जिल्हा परिषदेचे शिक्षक करत आहे. यामध्ये अंगणवाडीतील १३ तर वर्ग पहिली ते आठवी पर्यंतच्या एकुण ४३ चिमुकल्या मुला-मुलींचा समावेश आहे. शिक्षक चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवत असल्याने आता विद्यार्थ्यांना चांगले वळण लागले आहे. येथील विद्यार्थ्यांना दररोज पोषण आहार दिला जातो. सोबतच या विद्यार्थ्यांना कबड्डीसारख्या खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थीसुद्धा शिक्षकांमुळे आनंदित आहेत.
हेही वाचा -अमरावती : राज्यस्तरीय अंध क्रिकेट स्पर्धेत नांदेडच्या संघाची बाजी
या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चिखलदऱ्यातील मोरघट गावातील शाळेचे शिक्षक भारत रामटेके, दाबिया गावातील शाळेतील शिक्षक सुनील अंबाटकर तसेच पवन तिवारी अंजनगावबारी येथीलया तीन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मेळघाटातील हजारो कुटुंब हे मेळघाटातून येथे वीटभट्टीवर काम करायला येतात. आता यावर्षी सुरू झालेल्या या शाळेमुळे या विद्यार्थ्यांना याचा चांगला फायदा होत आहे. मेळघाटमध्ये दरवर्षी शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च होतात. मात्र, तरीदेखील शिक्षणापासून मुले वंचितच राहतात. म्हणून 'वीटभट्टी' या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी झटत असणाऱ्या शिक्षकाचे आणि प्रशासनाचे कार्य कौतुकास्पद आहे. तसेच ही शाळा अशीच सुरू रहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.