अमरावती - विकास म्हणजे मोठमोठे महामार्ग, अजस्त्र कारखाने असे समिकरण झाले आहे. हा विकास नाही असे नाही. पण, याच्यासाठी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर बुलडोझर फिरवला जातो तेव्हा, सरकारच्या हेतूवर 'प्रश्नचिन्ह' उभे करणे क्रमप्राप्त ठरते. अमरावतीतील मंगरुळ चव्हाळा येथे असाच प्रकार समोर आला आहे. आदिवासी मुलांच्या 'प्रश्नचिन्ह' या आश्रमशाळेचे अस्तित्व धोक्यात आहे. त्याचे कारण आहे सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग.
समृद्धी महामार्गामुळे शाळेवर बुलडोझऱ फिरवण्यात आला
अमरावती जिल्हातील मंगरुळ चव्हाळा हे छोटेसे गाव. फासे पारधी समुहाची बहुसंख्या असलेल्या या परिसरात शिक्षणाची काही सोय नाही. मतीन भोसले या तरुणाने २०१२ साली या ठिकाणी शाळा सुरू केली. नाव ठेवले 'प्रश्नचिन्ह'. लोकवर्गणी करुन शाळा उभारण्यात आली. आज या शाळेत १८८ मुले मुली शिक्षण घेतात. ज्यात बहुसंख्य मुले फासे पारधी समुहाची आहेत.
'प्रश्नचिन्ह' च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र सरकारचा समृद्धी महामार्ग हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. राज्यातील शहरे जोडली जाऊन विकास साधण्याचा याचा हेतू आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिगृहीत केल्या जात आहेत. या महामार्गाच्या वाटेत ही शाळा आली. २०१७ ला शाळेचे अध्यक्ष मतीन भोसले यांना शासनाची नोटीस मिळाली. भोसलेंनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अडचण सांगितली. त्यांनी आश्वासनही दिले. पण, काही कारवाई झाली नाही.
दोन दिवसांपूर्वी शाळेच्या काही वर्गखोल्यांवर बुलडोझर चालवण्यात आला. खोल्या पाडताना चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विरोध केला. मात्र, त्याचा काही परिणाम झाला नाही. आता हे विद्यार्थी आभाळाखाली बाके टाकून शिक्षण घेतात. एक तात्पुरता पत्र्याचा निवारा बनवण्यात आला आहे. दोन विहीरीतील पाणी आश्रमशाळेतील मुले वापरायची. त्या विहिरी देखील महामार्गाच्या जागेत गेल्या आहेत.
शाळेला १ कोटींचा दंड
शाळा पाडण्याला संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांनी विरोध केला. तरीही काही खोल्या पाडण्यात आल्या. पण, शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचे सांगून संस्थाचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. १ कोटी ३४ लाखांचे नुकसान झाल्याची नोटीस रस्ते विकास महामंडळाने मतीन भोसले यांना दिली आहे.
समृद्धी महामार्गाला शाळेचा 'अडथळा'
फासे पारधी हा अतिशय गरीब समुह समजला जातो. वर्षानुवर्षे या समुहावर गुन्हेगारीचा शिक्का बसला आहे. भिक मागून गुजरान करण्यात या समुहाची हयात जाते. अशा समुहासाठी शिक्षणाची कवाडे खुली करण्याचा निर्धार मतीन भोसले यांनी केला. या शाळेत १८८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण, आता या शाळेवर महामार्गाची संक्रांत आली आहे. समृद्धी महामार्ग महत्वाचा आहेच. पण, वंचित समुहाची समृद्धी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. प्रश्नचिन्हला नव्या मुख्यमंत्र्यांकडून मदतीची अपेक्षा आहे. याला सरकार काय प्रतिसाद देते हे येणारा काळच ठरवेल.