अमरावती - राज्यासह देशात प्रसिध्द असलेली जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा येथे गुढीपाडव्यानिमित्त भरणारी यात्रा प्रशासनाने कोरोनाचे विषाणूचे संभाव्य संकट पाहता रद्द केली आहे. याबाबतचे निर्देश चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकत दिले.
जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा ही येत्या 24 आणि 25 मार्चला गुढीपाडवा निमित्ताने सांवगा विठोबा या गावात भरते. लाखोंच्या संख्येने भाविक अवधूत महाराजांच्या यात्रेला दर्शनासाठी विविध राज्यांतून येतात. यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 72 फुट उंच खांबांना खोळ चढविण्याचा चित्तथरारक कार्यक्रम लाखो भाविक 3 तासात सतत उभे राहून पाहतात. तसेच कापूर ज्योत लावतात. या दरम्यान लाखो रुपयांचे कापूर यात्रेत जाळले जातात. 400 वर्षांपासून सुरु असलेल्या परंपरागत यात्रेला कोरोना विषाणूमुळे दक्षतेच्या दृष्टीने प्रशासनाने बंदी घातली असून मंदिर व्यवस्थापकांना पत्र देण्यात आले आहे.