अमरावती- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्राध्यापकांच्या 80 टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. विद्यापीठात एकूण 34 विभागांमध्ये 122 प्राध्यापक संख्या मंजूर आहेत, यापैकी 73 प्राध्यापक भरले असून 49 शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. विद्यापीठाशी संलग्नित सर्व 394 महाविद्यालयांचीही अशीच परिस्थिती आहे. अपुऱ्या प्राध्यापकांच्या भरवशावर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा डोलारा उभा असून दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या प्राध्यापकांची संख्याही बरीच असल्याने परिस्थिती गंभीर आहे.
कुलगुरू म्हणतात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही विद्यापीठात प्राध्यापकांची संख्या कमी असली तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी विद्यापीठाचे पूर्ण प्रयत्न आहेत. शासनाने आमच्या विद्यपीठाला 13 प्राध्यापक भरण्याची परवानगी दिली. कोरोनामुळे ही भरती प्रक्रिया लांबली असली तरी आता आम्ही ऑनलाइन मुलाखतीद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. आता 13 जणांच्या नेमणुकीला मान्यता मिळाली असताना विद्यपीठातील 7 प्राध्यापक सेवानिवृत्त झाले असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
गुणवत्ता राखण्यासाठी पूर्णवेळ शिक्षकांची गरज
नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षक हा संस्थेच्या हृदयस्थानी असल्याचे म्हटले आहे. तासिका तत्वावर काम करणारे शिक्षक विषयाला हवा तसा न्याय देऊ शकत नाहीत. NACC (न्याक) ला समोर जाताना विद्यापीठ आणि महाविद्यालयांना गुणवत्ता राखण्यासाठी पूर्ण वेळ प्राध्यापक कार्यरत असणे अत्यंत गरजेचेच असल्याचे अधिष्ठाता डॉ. अविनाश मोहरील यांनी स्पष्ट केले.
पुरेसे शिक्षक नसले तरी 'ए प्लस' मानांकन मिळण्याची आशा
संत गाडगेबाबा अमरावती विद्यपिठाला गतवेळी NACC चे अ दर्जाचे मानांकन मिळाले होते. यावेळी न्याकची तयारी पूर्ण झाली असून यावेळी ए प्लस मानांकन संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठाला मिळेल आणि यात शिक्षक संख्या अपुरी असल्याचा कुठलंही अडसर येणार नाही अशी आशा विद्यपीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रा. डॉ. खादरी म्हणाले.
तासिका तत्वावरील प्राध्यापकांसाठी जाचक अटी
एखाद्या विषयाचे पूर्णवेळ प्राध्याक महाविद्यालयात नसतील तर तासिका तत्वावर प्राध्यापक नेमून विद्यार्थ्यांना शिकवले जायचे. आता मात्र महाविद्यालयात रोस्टरप्रमाणे ज्या जाती संवर्गाच्या शिक्षकांसाठी जागा रिक्त आहेत, त्याच संवर्गातील तज्ज्ञ शिक्षक तासिका तत्वावर नियुक्त करण्याची अट शासनाने घातली आहे. पूर्वी 55 टक्के गुण असणारा व्यक्ती तासिका तत्वावर शिकवायचा या नव्या अटीमुळे अनेक विषयांसाठी तासिका तत्वावरही कुणी शिकवणारा भेटत नसल्याची खंत मूर्तिजापूच्या संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य आणि अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. संतोष ठाकरे यांनी व्यक्त केली.
शिक्षकांच्या पदमान्यतेसाठी शासनाकडून पैशांची मागणी
अनेक महाविद्यालयात शिक्षक नाहीत ही गंभीर बाब आहे. असे असताना एखाद्या संस्थेने शिक्षकांच्या पदासाठी शासनाकडे मान्यता मागितली तर एका पदासाठी मंत्री 5 लाख रुपये मागतात. उच्च शिक्षण संचालक, सहसंचालक सुद्धा पैशांची मागणी करतात. अनेकदा शिक्षकांच्या पदाला मान्यता देण्यासाठी विद्यापीठाकडूनही पैशांची मागणी केली जाते, असा खळबळजनक आरोप करताना याबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे असल्याचा दावा प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला.
परिस्थिती गंभीर
एकूण संपूर्ण परिस्थितीचा विचार केला तर प्राध्यापक नियुक्तीसाठी शासनाकडून मान्यता न मिळणे, दर महिन्यात अनेक प्राध्यापक निवृत्त होणे हा सर्व प्रकार शिक्षण क्षेत्राच्या भवितव्यावर विपरीत परिणाम करणारा ठरू शकतो असेच स्पष्ट होते.