अमरावती: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार युवकांना रोजगार देण्याचा संकल्प (employment to 75 thousand youth) राज्य शासनाने केला आहे. शासकीय नोकरीचे स्वप्न बाळगणाऱ्या व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांचे या उपक्रमाच्या माध्यमातून स्वप्न साकार होत आहे. या माध्यमातून सर्वसामान्यांच्या सेवेची संधी उमेदवारांना प्राप्त होत आहे. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी संघटितपणे कार्य करुया, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी आज केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नियुक्ती आदेशाचा वाटप कार्यक्रम नियोजनभवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते.
109 उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण:यावेळी मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात अमरावती विभागातील तीस जणांना, तसेच एकूण 109 उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. राज्यात सर्व विभागीय ठिकाणी हा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील मुंबई येथील कार्यक्रमाचे थेट प्रसारणही करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छापर संदेशाची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.