अमरावती -जिल्ह्यातील अनेक रेतीघाटंचे लिलाव न झाल्याने वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. वाळू चोरून नेणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या नायब तहसीलदार यांच्या अंगावर थेट वाळू माफियांनी ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना भातकुली तालुक्यातील पेढी नदीत घडला आहे. नायब तहसीलदार या घटनेत थोडक्यात बचावले असून तीन वाळू माफियांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील पेढी नदीमधून दररोज मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात असल्याची माहिती नायब तहसीलदार विजय मांजरे यांना मिळाली होती. त्याआधारे नायब तहसीलदार हे आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन नदीपात्रात ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेले होते. अवैध वाळू घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरला नायब तहसीलदारांनी थांबवले असता त्याने थेट तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. यात सुदैवाने नायब तहसीलदार विजय मांजरे हे थोडक्यात बचावले मात्र, ट्रॅक्टर चालकांनी तिथून पळ काढला. त्यानंतर नायब तहसीलदार यांच्या तक्रारीवरून सुरज नागमोते, विनोद पवार व मयूर भातकुलकर या तीन वाळू माफियांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.