अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या रेल्वेच्या ब्रॉडगेजमुळे व्याघ्र प्रकल्पातील वाघ व अन्य वन्य जीवांच्या अधिवासाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या रेल्वेचं मीटर गेजमधून ब्रॉडगेज करू नका. त्याबदल्यात दुसरा मार्ग तयार करा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे दीड महिन्यापूर्वी केली होती. परंतु,आता मुख्यमंत्र्यांच्या या मागणीला सत्ताधारी युवक काँग्रेस व प्रहारनेच विरोध केल्याने अमरावतीमध्ये पुन्हा सत्ताधारी पक्षांमध्ये राजकारण रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मेळघाट रेल्वे ब्रॉडगेजवरून मुख्यमंत्रीविरुद्ध सत्ताधारी युवक काँग्रेस आणि प्रहार मेळघाटात व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला-खांडवा हा १७६ किलोमीटरचा रेल्वेमार्ग मीटरगेजमधून ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. परंतु, या ब्रॉडगेजमुळे व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या अधिवासाला धोका निर्माण होईल, अशी भीती मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे मेळघाटातून जाणारा मार्ग बदलवून तो मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाबाहेरून नव्याने आखावा. तसे केल्यास जळगाव जामोद व संगमनेर तालुका व आजूबाजूच्या १०० गावांना त्याचा फायदा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. हा मार्ग बदलावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल व केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना दीड महिन्यापूर्वीच पत्र दिले होते. परंतु, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या भूमिकेला त्यांच्याच सरकारमधील युवक काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. मेळघाटातील काही स्वयंघोषित पर्यावरणप्रेमींनी राज्य सरकारकडे पाठवलेल्या अहवालात या ब्रॉडगेजमुळे वन्यप्राण्यांची हानी होईल, असे म्हटले होते. मात्र, ते चुकीचे आहे. गेल्या कित्येक वर्षांत वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला नाही, असेही युवक काँग्रेसने म्हटले आहे. आहे तोच रेल्वेमार्ग कायम ठेवावा, यासाठी युवक काँग्रेसने जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जर हा ब्रॉडगेजचा मार्ग बदलला तर शासनाविरोधात तीव्र आंदोलना चा इशाराही युवक काँग्रेसने दिला आहे. मीटर गेजचे ब्रॉडगेज न करता हा रेल्वे मार्गच बदला या मुख्यमंत्र्याच्या मागणीला केवळ युवक काँग्रेसचाच विरोध आहे असे नाही. तर, यापूर्वीही अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही याला विरोध केला होता. त्यात आता युवक काँग्रेससह सत्ताधारी शिवसेला पाठिंबा देणारे प्रहारचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या मागणीला कडाडून विरोध केला असून हा आमच्या आदिवासींच्या सोयींचा प्रश्न असल्याचे आमदार राजकुमार पटेल यांनी म्हटले आहे. एकीकडे राज्य सरकारमधील तीन पक्षांमध्ये असलेले मतभेद हे वारंवार चव्हाट्यावर येत आहे. त्यात आता मेळघाटमधील रेल्वेच्या ब्रॉडगेजवरून सत्ताधारी शिवसेनाविरुद्ध युवक काँग्रेस व प्रहार आक्रमक झाल्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील रेल्वेमार्गाचा प्रश्न पेटणार असल्याचे चिन्ह आहे.