अमरावती -आपल्या धर्मासोबत जमीनही टिकून राहावी म्हणून काही सिंधी बांधव पाकिस्तानात राहिले तर जमिनी गेल्या तरी आपला धर्म टिकून राहावा म्हणून अनेक सिंधी बांधव भारतात आलेत. भारताच्या विकासात सिंधी समाजाचा अतिशय मोलाचा वाटा आहे. सिंधी संस्कृती आणि भाषा टिकून राहावी यासाठी देशात सिंधी विद्यापीठ व्हावे अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे नाही. देशात निश्चितपणे सिंधी विद्यापीठ व्हावे ( Mohan Bhagwat About Sindhi University ) असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ( Mohan Bhagwat ) अमरावतीत म्हणाले.
कंवरधाम गद्दीनशिनी सोहळा -अमरावती शहरालगत भानखेडा मार्गावर साकारण्यात येत आहे. संत कंवरधाम येथे सिंधी समाजाच्या श्रद्धास्थान असणाऱ्या भव्य ठिकाणचे प्रमुख संत म्हणून संत कंवरराम यांचे पणतू साई राजेशलाल मोरडिया यांचा गद्दीनशिनी सोहळा अर्थात धार्मिक गादीवर विराजमान होण्याचा कार्यक्रम आज आयोजित करण्यातच आला होता. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, जगद्गुरु शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज आणि अंजनगाव येथील शक्तिपीठाचे जितेंद्रनाथ महाराज प्रामुख्याने उपस्थित होते. या सोहळ्याला अमरावती शहर आणि जिल्ह्यात सह देशातील विविध भागातून सिंधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजाचा दबाव हेच सरकारचे पेट्रोल -सिंधी भाषेचे विद्यापीठ व्हावे यासोबतच अखंड भारत पुन्हा प्रस्थापित व्हावा अशा अनेक इच्छा, भावना समाजाच्या आहेत. या व्यासपीठावर सुद्धा त्या व्यक्त झाल्या. सिंधी विद्यापीठासाठी प्रयत्न करावा अशी विनंती मला आज येथे करण्यात आली. मात्र मी सरकारमधील घटक नाही. हे सरकार असो वा इतर कोणतेही सरकार असो ते केवळ समाजाच्या दबावावरच चालत असते. समाजाचा दबाव हेच सरकारचे पेट्रोल आहे. आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करून घ्यायचा असेल तर या सरकारवर दबाव आणणे, यासाठी प्रयत्न करण्याचे आपल्या सर्व समाजाचे कर्तव्य असल्याचे डॉ. मोहन भागवत म्हणाले. आपल्या शब्दात वजन असायला हवे. आपल्यामध्ये एकत्र शक्तीची भावना असायला हवी ही अशी शक्ती आपल्याजवळ असली की कोणतेही सरकार आपल्या चांगल्या कामासाठी नकार देणार नाही, असा विश्वास देखील डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला.