ओढावलेल्या आपत्तीविषयी बोलताना बांगडे कुटुंबीय अमरावती:वडाळी परिसरातील एका छोट्याशा घरात महादेव बांगडे त्यांच्या पत्नी ज्योती बांगडे, एक मुलगी आणि दोन मुले तसेच दोन भाचे राहतात. घरी लग्न असल्यामुळे त्यांच्या सासू देखील आल्या आहेत. एकूण नऊ जण शनिवारी रात्री एकाच खोलीत झोपले असताना रविवारी पहाटे दीडच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. वादळामुळे ज्योती बांगडे ह्या उठल्या आणि घराबाहेर आल्या. त्याच क्षणी त्यांच्या घरावरील पत्र्याचे छत कोसळले.
थोडक्यात वाचले प्राण: छत कोसळले तेव्हा घरातील पंखा सुरूच होता; मात्र वेळीच विद्युत पुरवठा बंद करण्यात आल्याने घरातील सदस्यांचे प्राण वाचले. यानंतर महादेव बांगडे आणि त्यांच्या मुलीने कोसळलेल्या छताची बल्ली हातावर सांभाळली आणि प्रत्येकाला घराबाहेर काढले. घटनेची माहिती कळताच शेजारची मंडळी मदतीला धावून आली. सुदैवाने नऊ पैकी एकाही व्यक्तीला कुठलीही इजा झाली नाही.
लग्नासाठी घेतलेले धान्य भिजले:महादेव बांगडे हे मजुरीचे काम करतात तर त्यांच्या पत्नी ज्योती बांगडे ह्या कपडे शिवून कुटुंबासाठी दोन पैसे मिळवतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांनी केवळ एक पत्रिका छापून व त्याच्या झेरॉक्स काढून नातेवाईकांना वाटल्या. आता 3 मे रोजी लग्नाची वरात बांगडे कुटुंबीयांच्या दारावर येणार असून समारंभासाठी घरात डाळ, तांदूळ, गहू , साखर असे धान्य भरले होते. दरम्यान पावसामुळे घर पडल्याने घरातील सर्व धान्य भिजून वाहून गेले.
शेजाऱ्यांनी दिला धीर:बांगडे कुटुंबावर नैसर्गिक संकट कोसळल्यामुळे रात्री घरा शेजारील लोक त्यांच्या मदतीसाठी देवाप्रमाणे धावून आले. पाऊस मुसळधार कोसळत असल्यामुळे रात्रीच्या वेळी पडलेला घराचे काहीही करणे शक्य नव्हते. त्यामुळे शेजारच्या मंडळींनी बांगडे यांच्या घरातील सर्व सदस्यांना आपल्या घरी झोपवले. सकाळी पाऊस थांबल्यावर पडलेले घर पाहून बांडगे कुटुंबीयांना गहिवरून आले. कारण लग्नासाठी खरेदी केलेले धान्य आणि साहित्य पावसात भिजले होते. अखेर शेजाऱ्यांनी त्यांना धीर देत मुलीच्या लग्नासाठी शक्य होईल तितकी मदत करण्याचे आश्वासन देखील दिले.
हेही वाचा:Sharad Pawar : शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव, शरद पवारांच्या 'लोक माझे सांगती' पुस्तकात धक्कादायक खुलासा