महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती मतदारसंघ :  अडसूळांची हॅटट्रिक? की अमरावतीची सून बाजी मारणार?

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ अमरावती मतदार संघात हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेल्या युवा स्वाभिमानच्या नवनीत-कौर राणा या गेल्या निवडणुकीपेक्षा बऱ्याच परिपक्व दिसत आहेत. विशेष म्हणजे मागील वेळी पराभव होताच दुसऱ्या दिवसापासूनच नवनीत राणा यांनी जिल्हा पिंजून काढणे, जनसंपर्क दांडगा करणे यासाठी बरेच परिश्रम घेतले आहेत.

अमरावती मतदारसंघ

By

Published : Mar 30, 2019, 8:42 AM IST

अमरावती - मागील लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात जसे चित्र होते, तसेच चित्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही आहे. ५ वर्षांपूर्वी एकमेकांविरुद्ध लढलेले उमेदवार पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. यावेळी मतदारसंघात मोदी लाट नाही.

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ अमरावती मतदार संघात हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेल्या युवा स्वाभिमानच्या नवनीत-कौर राणा या गेल्या निवडणुकीपेक्षा बऱ्याच परिपक्व दिसत आहेत. विशेष म्हणजे मागील वेळी पराभव होताच दुसऱ्या दिवसापासूनच नवनीत राणा यांनी जिल्हा पिंजून काढणे, जनसंपर्क दांडगा करणे यासाठी बरेच परिश्रम घेतले आहेत. अडसूळ आणि राणा यांची थेट लढत होईल असे चित्र आज जरी वाटत असले तरी वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे हे किती शक्ती पणाला लावतात यावर सारे अवलंबून आहे. आज मतदारांचा कौल अनिश्चित भासत असून निवडणुकीचा निकाल लागल्यावर अमरावती मतदारसंघाचे चित्र अनपेक्षित असेल अशीच परिस्थिती आहे.

अमरावती मतदारसंघ हा अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. अमरावती जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. १९५१ ला झालेल्या देशाच्या पहिल्या लोकसभा निबंडणुकीत अमरावती जिल्ह्याने निवडून दिलेले डॉ. पंजाबराव देशमुख हे देशाचे पाहिले कृषीमंत्री झाले होते. त्यानंतर १९८४ पर्यंत झालेल्या सलग ९ निवडणुकांमध्ये अमरावती मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकला. १९८९ च्या निवडणुकीत पहिल्यांदा भाकपाचे सुदाम देशमुख यांनी काँग्रेसची विजयी घोडदौड रोखली. त्यानंतर १९९१ ते १९९६ पर्यंत प्रतिभाताई पाटील या काँग्रेसच्या खासदार होत्या. यानंतर १९९९ पासून आजपर्यंत अमरावतीत भगवा फडकतो आहे.
२००९ पासून अमरावती मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने मूळ साताऱ्याचे असणारे शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी राखीव असणाऱ्या बुलडाणा मतदार संघाचे दोनवेळा नेतृत्व केल्यावर अमरावतीत आले. पहिल्या निवडणुकीत त्यांनी डॉ. राजेंद्र गवई यांचा पराभव केला. २०१४ च्या निवडणुकीत मात्र बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी अडसुळांच्या नाकी नऊ आणले होते. नरेंद्र मोदी यांची अमरावतीत सभा झाली आणि त्यावेळी असणाऱ्या मोदी वादळात आनंदराव अडसूळ तरले. अडसुळांना ४ लाख ६७ हजार मतं मिळली होती. नवनीत राणा यांना ३ लाख २१ हजार २८० मतांवर समाधान मानाव लागलं. वास्तवात २०१४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बोटावर मोजता येतील इतकेच नेते, कार्यकर्ते घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या नवनीत राणा यांच्यासोबत होते.

खरं तर नवनीत राणा विजयी झाल्या तर त्यांचे पती रवी राणा जिल्ह्यात वरचढ होतील अशी भीती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वाटत होती. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बडनेरा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांचा रवी राणा यांनी पराभव केल्याने राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस असलेले सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके यांनी नवनीत राणा यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने बंडखोरीचा निर्णय घेतला. यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून काढण्यात आले. खोडकेंनी गत वेळी बसपाचे उमेदवार असणारे गुणवंत देवपारे यांना पाठिंबा जाहीर करून अडसुळांच्या विजयाचा मार्ग सुकर करून दिला होता.

आनंदराव अडसुळांनी जिल्ह्याचा किती विकास केला, यापेक्षा ते ५ वर्षाने पुन्हा नव्या राखीव मतदारसंघाच्या शोधात निघतील. ते काही काम करीत नसले तरी कुणाला दुखवत नाही, अडचणी निर्माण करत नाही, यामुळे त्यांना संधी दिलेली बरी अशी मानसिकता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची याहीवेळी जाणवत आहे. काँग्रेसच्या या खेळीचा फटका तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर वगळता जिल्हा काँग्रेसला बसला. आजच्या घडीला संपूर्ण काँग्रेस ही भाजपच्या दावणीला बांधली असल्याचे चित्र अमरावतीत आहे. आता वर्षभरापूर्वी विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे २०० मतदार असताना काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ १७ मतं मिळाली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी या निवडणुकीत बाजी मारली. काँग्रेसकडे मोठ्या संख्यने मतदार असताना अशी गत का झाली असा प्रश्न काँग्रेसच्या एकाही वरिष्ठ नेत्याला विचारावासा वाटला नाही अशी गंभीर काँग्रेसची आहे.

आजच्या घडीला नवनीत राणा या आपल्या विजयाबाबत चांगल्याच कॉन्फिडेंट दिसत आहेत. त्यांचा हा विश्वास त्यांनी सलग ५ वर्षे मेळघाटातील प्रत्येक गाव पिंजून काढून अमरावती, परतवाडा, तिवसा, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, बडनेरा या विधानसभा मतदार संघात सतत आयोजित केलेले विविध कार्यक्रम, महिला मेळावे यामुळे प्रचंड वाढला आहे. मागच्या निवडणुकीत तोडकी-मोडकी मराठी बोलणाऱ्या नवनीत राणा आता चांगल्यापैकी मराठीतुन संवाद साधतात हा सुद्धा प्लस पॉईंट आहे. मी अमरावतीची सुन आहे, अमरावतीतच राहणार. बाहेरच्या व्यक्तीला आता थारा देऊ नका असे त्या प्रत्येक भाषणात वारंवार सांगतात. याउलट अडसूळ यावेळी मागच्यापेक्षाही अधिक मतांनी निवडून येणार हा दावा करीत आहेत. जिल्ह्यातील अख्खी भाजप अडसुळांच्या पाठीशी आहे, हीच खरी अडसुळांची ताकद आहे. शिवसैनिकांपेक्षा भाजपचेच कार्यकर्ते आपल्याला तारणार हे अडसूळ जाणून आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सारेच लाचार असून आपल्यापुढे ते कोणी जात नाहीत तसेच पालकमंत्री प्रवीण पोटे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतलेले आणि राणांबाबतच्या आपल्या भूमिकेत कुठलाही बदल न करणारे संजय खोडके यांची मेहनत आपल्यापेक्ष अधिक असेलच ही अडसुळांना पक्की खात्री असल्याने त्यांना अमरावतीत हॅटट्रिक करूच असा विश्वास आहे.

राणा - अडसूळ यांच्या भांडणात वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे यांना आपण बाजी मारू असा आत्मविश्वास आहे. बसपाचे अरुण वानखडे हे सुद्धा मैदानात असले तरी रिपाइंच्या डॉ. राजेंद्र गवई यांनी नवणीत राणा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आनंदराव अडसूळ, नवनीत राणा, गुणवंत देवपारे हे सगळे आपण विजयी होऊ असे आत्मविश्वाने सांगत असले तरी मतदारांच्या मनात नेमके काय सुरू आहे याचा अंदाज बांधणे फार कठीण आहे. मतदार नेत्यांचे किती ऐकणार आणि आपल्या मनाने काय भूमिका घेणार हे निवडणुकीचा निकाल लागल्यावरच स्पष्ट होईल इतकी अटीतटीची आणि अनपेक्षित परिणामांची लढत अमरावतीत पाहायला मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details