अमरावती:या आरक्षण सोडतीमध्ये काही प्रस्थापित नगरसेवकांना धक्का बसला आहे. एका प्रभागातून तीन सदस्य निवडून येणार आहेत. तब्बल ११ प्रभागांमध्ये दोन महिला सर्वसाधारण आणि एक पुरुष सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाल्याने अनेक प्रस्थापित नगरसेवकांना पत्नी किंवा निकटच्या नातेवाईक महिलेला उमेदवारी देऊन लढत देण्याचा पर्याय निवडावा लागणार आहे.
अमरावती महापालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी एकूण ३३ प्रभाग आहेत, तर एकुण सदस्य संख्या ९८ आहे. त्यामधून तीन सदस्यांचे ३२ प्रभाग व दोन सदस्यांचा १ प्रभाग आहे. १७ जागा अनुसुचित जाती करीता राखीव झाल्या आहेत. त्यात प्रभाग क्रमांक १,२,८,९,१०,११,१२,१३,१४,१५,२३,२७,२८,३०,३१,३२, ३३ चा समावेश आहे. यापैकी आरक्षण सोडतीव्दारे ९ जागा महिला सदस्यांसाठी झाल्या आहेत. त्यात प्रभाग क्रमांक ११, १२, १३, १४, १५, २३, २८, ३१ आणि ३३ चा अंतर्भाव आहे.
तब्बल १८ प्रभांगांमध्ये दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने एकच जागा पुरूष उमेदवारांसाठी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी स्पर्धा निर्माण झाली आहे. वजनदार नगरसेवकांना उमेदवारी मिळवणे कठीण जाणार नसली, तरी अनेक नवख्या नगरसेवकांना या स्पर्धेमुळे आपल्या इच्छांना मुरड घालावी लागणार आहे. एकतर पत्नी किंवा निकटच्या नातेवाईक महिलेसाठी उमेदवारी मिळवून देण्याचा पर्याय आता या प्रभागांमध्ये त्यांच्या जवळ शिल्लक आहे.