अमरावती : खेळाडू असणारे संतोष कुमार अरोरा या सेवानिवृत्त शिक्षक यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. अमरावती आगारातील सर्व गाड्यांच्या काचावर आतल्या बाजूने सलग दोन दिवस संतोष कुमार अरोरा यांनी कागदाचे राष्ट्रध्वज चिटकवले. 1993 मध्ये त्यांनी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कागदाचे राष्ट्रध्वज भेट स्वरूपात वितरित केले होते. त्यावेळी दोनशे रुपयाला कागदाचे एकूण 200 लहान आकारातील राष्ट्रध्वज त्यांनी खरेदी केले होते.
तीस वर्षांपासून उपक्रम सुरू :26 जानेवारी 1993 पासून सुरू झालेला त्यांचा हा उपक्रम पुढे भारतीय स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही राष्ट्रीय सणाला सुरू झाला. आपल्या संत कव्हर राम विद्यालयासह संतोष कुमार अरोरा यांनी अमरावती शहरातील सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांना कागदाचे झेंडे वितरित करण्यास सुरुवात केली. अवघ्या दोन वर्षातच त्यांनी अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना कागदाचे झेंडे तसेच राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या तिरंग्याचे बिल्ले देखील वितरित केले. तीस वर्षांपासून सुरू असणाऱ्या त्यांच्या उपक्रमावर त्यांनी पाच ते सात लाख रुपये खर्च केले आहेत. विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांमध्ये देशप्रेम जागृत राहावे या उद्देशाने मी हा छोटासा उपक्रम राबवित असल्याचे संतोष कुमार अरोरा ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले.