अमरावती -राजापेठ उड्डाणपुलावर विनापरवानगी बसवलेला पुतळा रविवारी मध्यरात्री महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काढल्याने तणाव निर्माण झाला. त्यानंतर आज मध्यरात्री दर्यापूरमध्ये बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात काढला आहे. रविवारी मध्यरात्री हा पुतळा शिवसेनेच्या वतीने दर्यापूरमधील एका चौकात बसवण्यात आला होता. दरम्यान, कुठलाही वाद होऊ नये या अनुषंगाने पोलिसांनी ठिकाणी बंद कडेकोट बंदोबस्त केला आहे.
पुतळ्यासाठी पाण्याच्या टाकीवर प्रहारचे आंदोलन
दर्यापूर मध्ये विनापरवानगी शिवसेनेच्या वतीने मध्यरात्री शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा बसवल्या प्रकरणी रविवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान अमरावती प्रमाणेच दर्यापूर येथील हा पुतळा हटवण्याच्या हालचाली प्रशासनाच्या वतीने रविवारीच सुरू होत्या. त्यामुळे रविवारी दर्यापूर येथे प्रहारच्या वतीने पाण्याच्या टाकीवर चढून वीरूगिरी आंदोलन करण्यात आले. अखेर सायंकाळी वातावरण शांत झाल्यानंतर अखेर मध्यरात्री दर्यापूरमधील हा पुतळा काढण्यात आला आहे.