अमरावती - शुक्रवारी आम्ही पाच पाच तास रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रांगेत उभे होतो. त्यांनतर आम्हाला सांगण्यात आले की आज इंजेक्शन हे उपलब्ध नाही त्यांनतर पालकमंत्री यशोमती ठाकूर आल्या आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल आले तेव्हा कुठे मग आम्हाला इंजेक्शन दिले. म्हणजे जोपर्यंत वरून यांना ऑर्डर येत नाही तोपर्यंत हे इंजेक्शन वाटप करत नाहीत. मात्र, आज पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सकाळपासून आम्ही येथे रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी ताटकळत बसलो आहे. मात्र, अद्यापही आम्हाला इंजेक्शन मिळाले नाही एवढे थांबूनही इंजेक्शन मिळेल याची शाश्वती नाही असे अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात इंजेक्शनसाठी आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून रेमडेसिवीरचा तुटवडा - अमरावती कोरोना अपडेट
शुक्रवारी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आल्यानंतर लगेचच रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध झाले. आता तासनतास रांगेत उभे राहूनही मिळेल याची शाश्वती नाही, असे रूग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.
सध्या राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा हा कायम आहे. अमरावतीतही परिस्थिती काही वेगळी नाही.अमरावती जिल्ह्यातही मागील पंधरा दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयातून रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जाते. त्यासाठी सकाळी सहापासून रुग्णांचे नातेवाईक रांगेत उभे राहतात. मात्र, रेमडेसिवीर इंजेक्शनचा स्टॉक हा दहानंतर तर कधी बारानंतर उपलब्ध होत असल्याचा रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आम्हाला तासन्-तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. असे त्यांनी सांगितले.
अमरावतीमध्ये कोरोनावर उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. दररोज 150 ते 200 असे इंजेक्शन मिळत असून रुग्णांचे नातेवाईक 300 ते 400 इंजेक्शनसाठी नोंदणी करतात. त्यामुळे मागणीच्या अर्धेच इंजेक्शन हे नागरिकांना मिळत आहे.