अमरावती -ती आमच्यापैकीच एक होती. ती आमची बहिणी आमची ताई होती. जीवनयात्रा संपविण्यापूर्वी तिने लिहिलेल्या पत्रात आईबाबत प्रचंड काळजी, चिंता तिने व्यक्त केली. आज तिला जड अंतकरणाने आम्ही श्रद्धांजली वाहत असताना तिच्यामागे आता तिच्या आईचा आधार आम्ही होणार आहोत असा संकल्प करीत रेंजर्स असोसिएशनच्या राज्यभरातील पदाधिकारी आणि सदस्यांनी दीपाली चव्हाण यांच्या आईसाठी मदतनिधी उभारण्याचा निश्चय केला आहे. एकूण 25 लाख रुपयांचे अर्थसहाय्य रेंजर्स असोसिएशनच्यावतीने दीपाली चव्हाण यांच्या आई शकुंतला चव्हाण यांना दिले जाणार आहे.
आईची माफी मागून दीपाली चव्हाण यांनी घेतला जगाचा निरोप
'प्रिय आई सगळ्यात आधी मी घेत असलेल्या निर्णयाबद्दल मी तुझी जितकी माफी मागेल तितकी कमी आहे.' अशा शब्दात दीपाली चव्हाण यांनी आत्महत्त्या करण्यापूर्वी आईच्या नावे पत्र लिहिले होते. या पत्रात मी तुझी काळजी घ्यावी तर तूच माझा आताही सांभाळ करीत आहे. मी घरी येईपर्यंत माझी वाट पाहते. माझ्याशिवाय तू जेवण पण करीत नाही. तुझं दुखणं माझ्यापासून लपवून ठेवतेस. मी नोकरीला लागल्यापासून निदान तुझ्या औषधींचा खर्च तरी भागवणे मला गरजेचे होते. मात्र, ऑफिसच्या खर्चातून मला तुझा औषधींचा खर्चही जमला नाही. तुझा गोळ्या औषधे संपले की आहेत हे पण मी कधी बघितलं नाही. हरिसालला आल्यापासून तुझ्यासाठी मला कामातून वेळ पण काढता आला नाही, असे दुःख दीपाली चव्हाण यांनी जगाचा निरोप घेण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात दुःख व्यक्त केले आहे.