अमरावती- मागील एक ते दीड महिन्यापूर्वी चीनमध्ये आलेल्या कोरोना या जीवघेण्या विषाणूने आता जगभरातील ६० पेक्षा अधिक देशात पाय रोवला आहे. कोंबडीमुळे कोरोना विषाणू पसरतो या धादांत अफवेमुळे पोल्ट्री व्यवसायिकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या भीतीने चिकनची मागणी घटली असून त्याचे भावही घसरले आहे. जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक हे १० रुपये प्रति किलो जिवंत बॉयलर कोंबडी विकताना दिसून येत आहेत.
कोरोनामुळे जिवंत बॉयलर कोंबडीचा भाव १० रुपये किलो
मागील अनेक दिवसांपासून समाज माध्यमांवर कोंबडीमुळेच कोरोना विषाणूची लागण होते, अशा आशयाचे मॅसेज फिरत आहेत, त्याचा धसका चिकन खाणाऱ्या नागरिकांनी घेतला आहे. साधारणत: ८० ते ९० रुपये किलोला विकली जाणारी जिवंत बॉयलर कोंबडी आज १० रुपये किलोने विकण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. लाखोंची उलाढाल व्यावसायिकांनी या व्यवसायात केली आहे. परतुं, कोरोनामुळे मात्र कोंबडीला मागणी नसल्याने लाखोंच्या कोंबड्या शेडमध्ये पडून आहेत.
कोरोना संकटामुळे चिकन व्यावसायिकाला अश्रू अनावर
या परिस्थितीमुळे चिकन व्यवसायिकांवर संकट कोसळले आहे. इस्माईल शेख यांचे शहरात चिकन विक्रीचे दुकान आहे. मात्र, कोरोनाच्या अफवेमुळे लोकांनी चिकनपासून फारकत घेतली. त्यामुळे, इस्माईल यांचा धंदा डबघाईस आला आहे. या परिस्थितीमुळे गेल्या ४२ वर्षांपासून चिकन व्यवसाय करणारे इस्माईल शेख यांना आपल्या उदरनिर्वाहाची चिंता सतावत आहे. धंध्यात तोटा इतका की, परिस्थिती सांगताना त्यांना आपले अश्रू देखील अनावर झाले होते.
बहुतांश चिकन व्यावसायिक शेतकरी; कर्ज फेडण्याची चिंता