वृक्षप्रेमी अनिल चौधरी यांची प्रतिक्रिया अमरावती :अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या बागापूर या गावातील मूळ रहिवासी असणारे अनिल चौधरी हे शेतकरी आहेत. अगदी लहानपणापासून त्यांना वृक्षांबद्दल आकर्षण होते. वृक्षांचे महत्त्व जाणून घेण्याचे त्यांना कुतूहल होते. त्या छंदातून त्यांना आज परिसरात असणाऱ्या सर्वच झाडांबाबत संपूर्ण माहिती आहे. कर्करोग, मेंदूज्वर, विषबाधा, ताप, खोकला, सर्दी, महिलांचे आजार, मायग्रेन अशा विविध आजारांमध्ये कुठले झाड औषध म्हणून उपयोगी ठरते, याचे त्यांना ज्ञान आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी कोणतेही उच्च शिक्षण त्यांनी घेतलेले नाही, तरी वनस्पती शास्त्रातील अनेकांसाठी ते एनसायक्लोपीडिया आहेत. वनस्पती शास्त्रातील अनेक अभ्यासक, विद्यार्थी दुर्मीळ वनौषधी संदर्भात त्यांचे मार्गदर्शन घेतात.
जंगलातून जमा केल्या बिया :जिवती, कर्डिले, कांदा भाजी, करडू, कारेमाठ, कुंजरा, गोमटी, रान भेंडी, कस्तुरी भेंडी अशा अनेक रानभाज्यांच्या बिया अनिल चौधरी यांनी जमा केल्या आहेत. यासह लाल चवळी, देशी वाटाणा, देशी पपई, लाल हादगा, देशी टोमॅटो, बोर मिरची, अंबाडी, पांढरी वांगी, अश्वगंधा, असे भाज्यांचे देशी वाण आणि शमी, भुत्या, पिवळा पळस, काळी टाकळी, दही पळस, महाबेल, लहान बेल, धामण, चारोळी, बिबा, चिंच, कुंभी, लाल गुंज, पांढरी गुंज या दुर्मीळ झाडांच्या बिया अनिल चौधरी यांनी थेट गडचिरोली आणि मेळघाटच्या जंगलात फिरून साठवून ठेवल्या आहेत.
दुर्मीळ झाड जगविणे :अनिल चौधरी म्हणाले, कीमी माझ्या शेतात पूर्णतः नैसर्गिक शेती करतो. आयुर्वेदिक फळभाज्या माझ्या शेतात मोठ्या प्रमाणात लावतो. पुणे, औरंगाबाद याठिकाणी असणारे वनौषधींचे जाणकार माझ्याकडून विविध वनौषधींच्या बिया हक्काने मागून घेतात. वृक्ष प्रेमींसाठी मी माझ्याजवळ असणाऱ्या बिया एक पैसाही न घेता देऊन टाकतो. दुर्मीळ झाड जगविणे, हाच त्यामागचा उद्देश असल्याचे अनिल चौधरी म्हणाले.
'असा' झाला वनस्पतींचा अभ्यास :मी लहान असताना आमचे कुटुंब एका सिद्धपुरुषाला श्रद्धापूर्वक मानत होते. मी लहानपणापासूनच त्या सिद्धपुरुषाच्या सेवेत होतो. विविध गावातील आजारी पडलेल्या लोकांचा ते सिद्धपुरुष वनौषधींच्या माध्यमातून उपचार करायचे. त्यांच्यामुळे वनौषधींची ओळख व्हायला लागली. ते मला अनेकदा जंगलात पाठवून या झाडाचे फळ, कंद, पाला आण असे काम सांगायचे. या कामातूनच मला आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्व झाडांची नावे कळून उपयोग समजला, असे अनिल चौधरी यांनी सांगितले.
दुर्मीळ वृक्षांचे महत्व :पूर्वीपासूनच आयुर्वेदात महत्त्व असणारे अनेक वृक्ष विदर्भात विविध ठिकाणी आहेत. अनिल चौधरी यांच्या माध्यमातून अमरावती शहरासह चांदूर रेल्वे परतवाडा तसेच चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विविध वृक्षप्रेमी संस्थांना दुर्मीळ वृक्षांसंदर्भात अनेकदा माहिती दिली जाते. विदर्भात अनेक ठिकाणी असणाऱ्या दही पळस या वृक्षाखाली कधीही साप किंवा विंचू येत नाही. विशेष म्हणजे साप किंवा विंचवाने दंश केला, तर त्याचे विष दही पळस वृक्षाच्या सालीच्या सेवनामुळे उतरते. इतकेच नव्हे तर दारू पिऊन नशेत असणाऱ्या व्यक्तीला या झाडाखाली नेले तर त्याची दारू देखील उतरते, असे या वृक्षाचे महत्व अनिल चौधरी यांच्या माध्यमातून अनेकांना कळले आहे.
वृक्षांची महत्त्वपूर्ण माहिती :यासह विदर्भात अनेक ठिकाणी असणारे गुदगुल्यांचे झाड, भुत्या वृक्ष, शमीच्या झाडासह जंगलातील वनौषधीयुक्त भाज्या देखील अनिल चौधरी यांच्या माध्यमातून अनेक निसर्गप्रेमींना चाखायला मिळाल्या आहेत. वृक्षांबाबत असणारे अज्ञान, सर्वसामान्यांकडे उपलब्ध नसणारी माहिती, यामुळे परिसरातील अनेक महत्त्वाचे वृक्ष दुर्मीळ होत चालले आहेत. या वृक्षांचे महत्त्व सर्वसामान्यांना कळावे, यासाठी अनिल चौधरी हे ज्या ठिकाणी जातात, त्या भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरात असणाऱ्या वृक्षांची महत्त्वपूर्ण माहिती देखील देतात. त्यांच्या या उपक्रमामुळे दुर्मीळ होत जाणारे वृक्ष जतन करण्याची प्रेरणा अनेकांना मिळते आहे.
वृक्ष जतन करण्याचा उपक्रम :दुर्मीळ होत चाललेल्या वृक्षांच्या बिया अनिल चौधरी यांच्याकडून अनेकजण नेतात. ते आपल्या घराच्या अंगणात, शेतात लावतात. या दुर्मीळ वृक्षांची संख्या वाढावी, यासाठी प्रयत्न करायला लागले आहेत. औरंगाबाद, पुणे येथील वृक्षप्रेमी संघटना दरवर्षी अशा दुर्मीळ बिया अनिल चौधरी यांच्याकडून घेऊन जातात. अमरावती शहरात देखील पोहरा मार्गावर काही वृक्षप्रेमींनी त्यांच्या माध्यमातून दुर्मीळ वृक्ष जतन करण्याचा उपक्रम राबविला आहे. दुर्मीळ होत जाणारे वृक्ष टिकावे, यासाठीच माझा प्रयत्न आहे. निसर्गातील प्रत्येक झाड महत्त्वाचे आहे, त्याची माहिती मिळवा आणि त्याचा उपयोग देखील करुन घ्यावा, असे आवाहन अनिल चौधरी करतात.
हेही वाचा :
- वृक्षप्रेमींनी केली वृक्षावर शस्त्रक्रिया; बुडापासून तोडलेले झाड पुन्हा केले उभे
- 'जलपात्रं' मिटवतेय मुक्या जीवांची तहान; कोल्हापूरातल्या संस्थेच्या पुढाकाराने झालं शक्य
- अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पेनेतून राज्यात पहिल्यांदाच साकारली 'वृक्ष बँक'