अमरावती- अमरावतीचे माजी आमदार राबसाहेब शेखावत आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सुर्यवंशी यांच्यातील संवादाची क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांचे राजकीय भविष्य संकटात सापडण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या क्लिपपमुळे शेखावत आणि सुर्यवंशी हैराण झाले असताना भाजपच्या विद्यमान आमदारांसाठीही धोक्याची घंटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या ऑडिओ क्लिपमध्ये शेखावत आणि सुर्यवंशी यांच्या आवाजासोबतच तिसरा आवाजही ऐकू येत आहे.
निवडणूक लढण्यासाठी सुर्यवंशी यांना ५ कोटी रुपये कोणाकडून मिळवून देण्याबाबत शेखावत बोलत आहेत, हे जसे कोडे आहे. तसेच क्लिपमध्ये ऐकू येणारा तिसरा आवाज कोणाचा? हे सुद्धा एक रहस्यच आहे. राजकीय भूकंप आणणाऱ्या रावसाहेब शेखावत आणि प्रा. दिनेश सुर्यवंशी यांची व्हायरल ऑडिओ क्लिप काळजीपूर्वक ऐकली की अनेक धक्कादायक बाबी समोर येतात. तिवसा येथील काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत कसे करायचे? याचे षडयंत्र रचण्याबाबत झालेल्या संवादात अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, अमरावतीचे आमदार डॉ. सुनील देशमुख, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि २०१४ मध्ये तिवसा मतदार संघात यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवार असणाऱ्या निवेदिता चौधरी यांच्या नावाचा उल्लेख येतो.
या संवादात सुनील देशमुख आणि प्रवीण पोटे यांच्याशी तुमचे कसे संबंध आहेत?, असा प्रश्न रावसाहेब शेखावत सुर्यवंशी यांना विचारतात, तेव्हा दिनेश सुर्यवंशी स्पष्ट सांगतात की, पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याशी माझे एकदम चांगले संबध आहेत. याबाबत नो डाऊट. मी त्यांच्याशी आताच बोललो की, भाऊ मला तुम्ही आत्ताच सांगून द्या, कारण तुम्ही अशा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करता. जेथे काँग्रेसचा प्रत्येक व्यक्ती तुम्हाला मदत करतो. तुम्ही त्यांना मदत करता आणि घेताही. मला अगोदर यशोमती ठाकूरबद्दल सांगून टाका, असे बोलतात. त्यावेळी शेखावत मध्येच त्यांना निवेदिता चौधरींची समजूत काढाण्यासाठी सांगत आहेत. की, त्यांनी दुसऱया मतदार संघातून निवडणूक लढवावी.
त्यानंतर ५ कोटी रुपयांचा विषय येतो. त्यावर रावसाहेब शेखवत स्पष्ट म्हणतात की, आज तुमच्या समोर सांगतो त्यांना 'You will get the money' हे कोणाशी बोलायचे नाही. त्यावेळी शेखवतांचे वाक्य थांबत नाही तोच तिसरा आवाज ऐकू येतो 'नाही नाही कुठेच नाही, हा विषयच नाही. असे तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकायला येते. याचाच अर्थ शेखावत आणि सुर्यवंशी यांच्यातील या संवादाच्यावेळी आणखी कोणीतरी तिसरी व्यक्ती संवादस्थळी उपस्थित होती हे स्पष्ट आहे.
या ऑडिओ क्लिपने अनेक प्रश्न उपस्थित केले असताना पालकमंत्री प्रवीण पोटे काँग्रेसची मदत घेतात आणि त्यांना मदतही करतात, हे भाजपचे जिल्हाध्यक्ष मान्य करतात. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पालकमंत्री आमच्यासोबत की काँग्रेसच्या मदतीला, असा सवाल उपस्थित करून काही आमदारांनी थेट पक्षश्रेष्ठींकडेच धाव घेतली असल्याची विश्वसनीय माहिती आहे. आता हे ऑडिओ प्रकरण केवळ चघळण्याचा विषय राहिला नसून अनेकांच्या राजकीय भवितव्याचे भाकीत यामध्ये दडले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.