अमरावती Iron man Awards: समाज व्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड समुळ नष्ट करून त्यास लगाम घालण्यासाठी राज्यात लाच लुचपत विभाग कार्यरत आहे. याच विभागा अंतर्गत येथील कार्यालयांत कार्यरत असलेले पोलिस कर्मचाऱ्यानी अतिशय कठीण परिश्रम करुन 'आर्यन मॅन ' ही स्पर्धा जिंकून नावलौकिक वाढवले आहे. तर 'आर्यन मॅन'चा पुरस्कार पटकावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे राजेश वासुदेव कोचे (Rajesh koche) असे नाव आहे. अलीकडेच गोवा येथील पणजी येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धा जिंकल्या नंतर मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग : राजेश कोचे हे अमरावती येथील लाच लुचपत विभागात हेड कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहे. लहानपणापासूनच त्यांना धावण्याची आवड आहे. २००४ मध्ये पोलीस खात्यात रुजु झाल्यानंतर पोलिस खात्याअंतर्गत तसेच इतरही मॅरेथॉन स्पर्धांमध्ये (Marathon) भाग घेतला. पुणे, नाशिक, मुंबई, नागपूरसह, दिल्ली, केरळ, तामिळनाडू आणि हैदराबाद येथे त्यांनी विविध स्पर्धा गाजवल्या. 'नॅशनल रनर' अशी ओळख असलेल्या राजेश यांनी आतापर्यंत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. ट्रॅक ओन फील्ड, रोड रनिंग स्पर्धा (क्रॉस कंट्री) मध्ये विद्यापीठाचे ५ कलर कोट मिळाले आहे.
काय आहे 'आर्यन मॅन ' स्पर्धा: सर्व काही शक्य आहे (Any Thing Is Possible) हे घोष वाक्य असलेली 'आर्यन मॅन स्पर्धा' नुकतीच पणजी येथे घेण्यात आली. जागतिक स्तरावरील या स्पर्धेत देश विदेशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. साडेआड तासांमध्ये दोन किलोमीटर समुद्रात पोहणे, रस्त्यावर ९० किलोमीटर सायकल चालविणे आणि २१ किलोमीटर धावणे हे सर्वच प्रकार स्पर्धकाला दिलेल्या वेळेत पूर्ण करावे लागते, हे आव्हान राजेश यांनी पेलत अवघ्या ७ तास २ मिनिटांत हे आव्हान पूर्ण करून हा बहुमान पटकविला. जागतिक पातळीच्या या स्पर्धेत ५० देशांतून १६०० स्पर्धेकांनी सहभाग नोंदविला होता. जागतिक पातळीवरील नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेची गणना होते.