अमरावती - केवळ अचलपूर मतदार संघासाठी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आघाडी तुटू नये अशी आमची भूमिका आहे. या भूमिकेमुळेच आम्ही सोमवारी तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. दर्यापूर मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली. या ठिकाणी आमचे बळवंत वानखडे उमेदवार असतील आणि अचलपूर मतदार संघात मी स्वतः निवडणूक लढणार आहे. या ठिकाणी काँग्रेसचे बबलू देशमुख उमेदवार असतील तर राज्यातील 286 मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असतांनाच अचलपूर मतदार संघात काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्याविरोधात प्रचाराला यावे, असे विधान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी केले आहे.
अचलपूर मतदार संघातून आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा डॉ. राजेंद्र गवई यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. यासंदर्भात माहिती देताना गवई म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मदत केली. विधानसभा निवडणुकीत आम्हाला अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आणि अचलपूर मतदारसंघ मिळावे अशी मागणी केली होती. सोमवारी हा तिढा सोडविण्यासाठी आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. काँग्रेसने दर्यापूर मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोडण्याची तयारी दर्शविली. दर्यापूर मतदारसंघात आमच्या पक्षाच्या वतीने बळवंत वानखडे निवडणूक लढणार हे मी आधीच स्पष्ट केले आहे. अचलपूर मतदारसंघ मात्र, माझ्यासाठी सोडावा अशी मागणी मी काँग्रेसकडे केली याबाबत काँग्रेसकडून कुठलेही स्पष्टीकरण आले नाही. असे असले तरी 3 ऑक्टोबरला मी अचलपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे असे गवई म्हणाले.