मोर्शी (अमरावती)- मागील दहा दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावस जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी (दि. 28 जून) सायंकाळच्या सुमारास मोर्शी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळाला आहे.
या मुसळधार पावसामुळे मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई गावाच्या परिसरातही जोरदार पाऊस झाल्याने नेर पिंगळाई गावात रस्त्यावर पाणी वाहत होते. रस्त्यालगतच्या काही दुकानात पाणी शिरल्यावर व्यावसायीकांचे नुकसान झाले.
मोर्शी तालुक्यात दमदार पाऊस रविवारी सायंकाळी अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील दहा दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केली होती. पण, अचानक पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता. दरम्यान, रविवारी सायंकाळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील 65 टक्के शेतकऱ्यांनी पेरणीचे काम आटोपले होते. पण, जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मागील 10 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे नुकतेच कोंब फुटून बाहेर आलेल्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. पाणी न मिळाल्याने दुबार पेरणी करण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये होती. त्यामुळे पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांना बाहेरून पाणी द्यावे लागत होते. मात्र, आता पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
हेही वाचा -चुलत्याच्या शेतात पुतण्याने तणनाशक फवारणी करुन सोयाबीन पीक केले नष्ट