अमरावती -गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल जाणवतो आहे. वेस्टर्न डिस्टबन्ससच्या प्रभावामुळे विदर्भात किमान तापमान 8 सेल्सिअस अंशांपर्यंत खाली गेले होते. परंतु आता वेस्टर्न डिस्टबन्ससचा प्रभाव कमी झालेला आहे. तसेच वारेसुद्धा आता दक्षिणेकडून वाहात आहेत. त्यामुळे विदर्भात तापमान वाढ झालेली आहे. कमाल तापमान 34 सेल्सिअस अंशांपर्यंत पोहोचले आहे. दरम्यान येत्या १६ व १७ फेब्रुवारीला विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या गडगटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्रातून ९०० मिटर उंचीवरून वाहत असलेले चक्राकार वारे आणि सोबतच पुर्वेकडून हवेच्या खालच्या स्तरात वाहत असलेले बाष्पयुक्त वारे यामुळे विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आले. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान गहू, हरभरा यासारखी पिके काढणीस आल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.