अमरावतीShiv Mahapuran Katha : अमरावती शहरातील विलासनगर, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था या भागात बिबट्या (Leopard) धुमाकूळ वाढलेली आहे. शहरालगत असणाऱ्या पोहरा मालखेड जंगलात (Malkhed Forest Area) प्रवचनाच्या तयारीसाठी सुमारे दहा ते बारा एकर जमिनीवर पसरलेली झाडं-झुडपं नष्ट केली जात आहे. ज्या भागात झाडझुडपं कापल्या जात आहे ती जागा खाजगी असली तरी तो संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने वेढला आहे. त्या भागात बिबटसह अनेक वन्य प्राण्यांचा वावर आहे. दीड वर्षांपूर्वी या भागात वाघाचं देखील वास्तव्य होतं. एकीकडे शहरात बिबट्या धुमाकूळ घालीत असताना प्रवचनासाठी हे जंगल साफ केलं जात आहे. तर या जंगल तोडीमुळे भविष्यात ओढाविणाऱ्या समस्यांबाबतचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.
प्रवचनासाठी जंगलात जोरदार तयारी : प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेच्या (Shiv Mahapuran Katha) सोहळ्याला विदर्भातून पाच लाखाच्यावर भाविक येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा सोहळा मालखेड मार्गावर असणाऱ्या घनदाट जंगल परिसरात होणार आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या वतीनं हनुमान चालीसा ट्रस्टला नुकत्याच 20 ऑक्टोबरला 10 एकर जागा दान केली. त्याच जागेवर प्रदीप मिश्रा यांचं प्रवचन होणार आहे. जंगलचा परिसरात प्रचंड प्रमाणात झाडं झुडपं होती. ही सर्व झाडझुडप एकूण पाच ते सहा जेसीबी लावून काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या ठिकाणी लवकरच 111 फूट उंच श्री हनुमानाची मूर्ती देखील स्थापन केली जाणार आहे. एकंदरीत सध्या प्रदीप मिश्रा (Pradeep Mishra) यांच्या शिव महापुराण कथेसाठी या जागेवर जोरदार तयारी सुरू आहे.
जंगल तोड विरोधात रोष: ज्या भागात प्रदीप मिश्रा यांचे प्रवचन होणार आहे तो संपूर्ण परिसर घनताट जंगलाने वेडला आहे. त्या ठिकाणी बिबट, अजगर, मोर, खवल्या मांजर, काळवीट, चिंकारा, हरीण, निलगाय आदी अनेक प्रकारचे दुर्मिळ प्राणी आहेत. जंगलात कुठल्याही कार्यक्रमानिमित्त तसेच अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड सुरू आहे. यामुळे जंगलातील वन्य प्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला असल्यासंदर्भात, वाईल्ड लाईफ वेल्फेअर रिसर्च अँड रेस्क्यू वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष निलेश कंचनपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे. या जंगल भागात असणाऱ्या वन्य प्राण्यांना मानवी हस्तक्षेपामुळे धोका निर्माण होणार नाही, यासाठी वन विभागाने काळजी घ्यावी इतकीच अपेक्षा असल्याचे निलेश कंचनपुरे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.