अमरावती - वर्षातून चार-सहा महिने शेतात मजुरी करून घरखर्चाला हातभार लावणे, पाण्याच्या टंचाईमुळे अनेकदा हतबल होत असणाऱ्या चांदुर रेल्वे तालुक्यातील निंभा गावातील महिला बचतगटाच्या माध्यमातून एकत्र आल्या. चार पैसे घरात अधिक येतील यासाठी काही तरी करावे, असा विचार बचतगटातील प्रत्येकीच्या मनात घोळत होता आणि 2016मध्ये गावाच्या सरपंच आणि सावित्रीबाई फुले सोलर चरखा बचतगटाच्या अध्यक्ष नंदा गणवीर यांच्या पुढाकाराने सौर ऊर्जेवर चालणारे 10 चरखे खरेदी करण्यात आले. पाच वर्षांपूर्वी या चारख्यांद्वारे मजबूत सुताच्या निर्मितीला सुरुवात झाली. आज महिन्याला 50 हजार आणि वर्षाला 6 लाख रुपयांचे सूत अकराशेच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या निंभा गावात तयार होत आहे. गावातील 10 कुटुंब सूतनिर्मितीतून समृद्धीकडे वाटचाल करीत आहेत.
पाच लाख रुपये अर्थसहाय्य घेऊन सुरू झाला स्वयंरोजगार
निभा गावाच्या सरपंच नंदा गणवीर यांनी 2015मध्ये सूत निर्मितीसंदर्भात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अमरावती कार्यालयांतर्गत चांदुर रेल्वे तालुका औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्थेचे मार्गदेशन घेतले. गावातील महिलांना स्वयंरोजगाराची जाणीव करून दिली. महिलांना एकत्र आणण्यासाठी सावित्रीबाई फुले सोलर चरखा महिला बचतगटाची स्थापना केली. या बचत गटाने सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून पाच लाख रुपयांचे अर्थसाह्य घेतले आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या 10 चरखायंत्रांची खरेदी केली आणि नवा व्यवसाय सुरू झाला.