अमरावती- भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकार हे सी.ए.ए आणि एन.आर.पी च्या माध्यमातून राज्यघटनेचा गाभा तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजप बंदुकीच्या बळावर विचार लादण्याचा प्रयत्न करीत असून तरुणांच्या डोक्यावर विचार बिंबवून त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपचा हा डाव हाणून पाडण्यासाठी महा विकास आघाडीच्या माध्यमातून पुरोगामी विचार सर्वत्र पसरविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असे महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या सन्मानार्थ आज अमरावतीच्या टाऊन हॉल येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राजकीय परिवर्तन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जोगेंद्र कवाडे यांनी भारतीय जनता पक्ष हा विश्वासघातकी व फसवणूक करणारा पक्ष आहे. चीनमध्ये आलेल्या कोरोना वायरसपेक्षाही भाजपचा वायरस घातक असून भाजप सरकार हे देशावरील संकट असल्याचा घणाघात पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र यांनी केला.
भाजप हे दुतोंडी सरकार आहे. भाजपने निवडणुकीपूर्वी १५ लाख खात्यात जमा करण्याचे, एका वर्षात दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात काहीही न दिले नाही. उलट सीएए, एनपीआर सारखे कायदे आणून लोकांच्या नागरिकत्वावर गदा आणली आहे. महात्मा गांधींची १५० वी जयंती साजरी होत असताना भाजप सरकार नथुराम गोडसेला देशभक्त ठरविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे, भाजप माती खाणारा दुतोंडी साप असून त्यांच्याकडून कुठल्याही अपेक्षा घातक असल्याची टीका देकील प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी केली.
या सोहळ्याला परिपाठाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे पत्रकार दिलीप एडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरावती शहर अध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश खारकर, हरिभाऊ मोहोड, पिरिपाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष डी.जी. खडसे, काँग्रेसचे दिलीप काळबांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा-'..त्या विद्यार्थिनींनी प्रेमविवाह न करण्याची शपथ घेऊन जनजागृतीचा प्रयत्न केला'