अमरावती - राज्यात मागील दीड वर्षापासून कोरोनाचे सावट आहे. त्यात आता दुसरी लाट राज्यात असल्याने लॉकडाऊन लावण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच पर्यटनक्षेत्र सुद्धा बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विदर्भाचे नंदनवन असलेले चिखलदरादेखील सध्या लॉकडाऊन आहे. मागील वर्षीही लॉकडाऊनमुळे कोट्यवधीचा फटका यापर्यटननगरीला बसला होता. चिखलदऱ्यातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचे कुटुंब ही पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र, पर्यटनच बंद असल्याने पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.
'पैसे कमवण्यासाठी दुसरे कुठलेच साधन नाही'
विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळख असलेले चिखलदारा त्याच्या अद्भुत नजाऱ्यासाठी ने प्रसिद्ध आहे. राज्यभरातील लाखो पर्यटक दरवर्षी येथे पर्यटनासाठी येत असतात. पर्यटकांच्या माध्यमातून येथील लोकांना मोठा व्यवसाय निर्माण झाला आहे. पर्यटनामुळे हॉटेल, लॉज, जिप्सी चालक, जंगल सफारीमध्ये काम करणारे गाइड या लोकांचा पर्यटनावर उदरनिर्वाह होतो. मात्र, मागील वर्षी आणि आतासुद्धा दोनपेक्षा जास्त महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे पर्यटन नगरी बंद झाली आहे. त्यामुळे पर्यटकांना चिखलदऱ्यामध्ये बंदी घातली आहे. पैसे कमवण्यासाठी दुसरे कुठलेच साधन चिखलदऱ्यातील लोकांना नाही, पर्यटनावर येथील लोक अवलंबून असतात.
'नियम ठरवून पर्यटन सुरू करावे'
येथील आदिवासी बांधव देखील छोटे मोठे व्यवसाय करुन आपल्या पोटाची खळगी भरतात. मात्र, शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे प्रचंड नुकसान होत असल्याचे येथील व्यावसायिक सांगतात. त्यामुळे शासनाने कोरोनाचे नियम ठरवून पर्यटन सुरू करावे, अशी मागणी येथील लोकांनी शासनाला केली आहे.